ऐक देवी पृथ्वी तुझी कहाणी ..........
आटपाट सूर्यमाला होती.तेजस्वी सूर्य मधे तळपत होता .ग्रह गुण्यागोविंदाने भोवती गोल फिरत होते .त्यांचे उपग्रह होते ,काही लघुग्रह होते ...उल्का, धूमकेतू यांनी घर कसं भरलं होत.
एकच दुःख होतं. कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी नव्हती.जीवसृष्टीसाठी नियम फार कडक! कोण घेणार हा वसा?
पृथ्वी पुढे आली. विश्वदेवाला म्हणाली मी घेते हा वसा.....उतशील मातशील... घेतला वसा टाकशील ..
उतणार नाही.... मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.
पृथ्वी पुढे आली. विश्वदेवाला म्हणाली मी घेते हा वसा.....उतशील मातशील... घेतला वसा टाकशील ..
उतणार नाही.... मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.
बाई ,,बाई ...ठीक आहे.

पृथ्वीनं तसं केलं ,योग्य ते तापमान मिळालं
आतला राग शांत कर..
पृथ्वीनं लावा शांत केला .....
कठीण पृष्ठभाग मिळाला ,
डोंगर दऱ्या बनले
गर्वाने जास्त फुगू नको कि निराशेने खंगून जाऊ नको .....
पृथ्वीने तसं केलं, योग्य तो आकार ठेवला,
योग्य तेवढं गुरुत्वाकर्षण मिळालं.......................
शालीनतेच्या पदर ढळू देऊ नको.....
पृथ्वीनं चुंबकीय क्षेत्राचा पदर ओढला ....
सौरवातापासून रक्षण झालं.
सगळ्यांना धरून ठेव....... .पृथ्वीने वायू बांधून ठेवले .
वातावरण तयार झाल, पाणी धरून ठेवलं, समुद्र तयार झाल.
अहंकार ठेऊ नको नम्रतेने वाक .... पृथ्वीने तसं केलं ,नम्रतेने २३.५ अंशातून वाकली , पृथ्वीला ऋतुप्राप्ती झाली.
स्वतःभोवती फिर, गती काही सोडू नको .......
पृथ्वीने तसं केलं,
पृथ्वीने तसं केलं,
२४ तासातच फिरू लागली ,
दिवस आणि रात्र मिळाली.
मोठ्यांचा आदर कर ... ...
गुरूला भाऊ मानल ..
उल्कांपासून रक्षण झालं
लहानांना प्रेम दे ... ..... चंद्राला जवळ केलं ...
भरती-ओहोटीच्या चक्र मिळालं.
पृथ्वीचा वसा पूर्ण झाला ......विश्वदेवता प्रसन्न झाली ..अंतराळातून एक उल्का आली ,जीवसृष्टीची बीजे ओटीत टाकून गेली..
समुद्राच्या गर्भात वाढू लागली........, चंद्राच्या प्रेमानं भरती आली... त्यानं जीवसृष्टी जमिनीवर आली.
पशु-पक्षी,कीटक झाडे-झुडपे कीड-मुंगी माणसे जन्माला आली. पृथ्वीने जीवसृष्टीचा सांभाळ केला.
विश्वदेवता प्रसन्न झाली ..बाई बाई वर माग
स्वतः साठी काही नको ..लेकरांसाठी मागते ..जो कोणी हि कहाणी वाचेल त्याला खगोलशास्त्राच ज्ञान दे ...जीवसृष्टीच्या रक्षणाच भान दे.
स्वतः साठी काही नको ..लेकरांसाठी मागते ..जो कोणी हि कहाणी वाचेल त्याला खगोलशास्त्राच ज्ञान दे ...जीवसृष्टीच्या रक्षणाच भान दे.
विश्वदेव तथास्तु म्हणाले.
अशी हि साठा उत्तरांची कहाणी आकाशगंगेच्या पारी ,काळ्याकृष्णविवरी ,तेजोमेघाच्या अंतरी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
__________________________________________________
कहाणी हा मराठी लोकवाग्मयातला एक गोड प्रकार . श्रावणात प्रत्येक वाराची.देवाची. सणाची कहाणी वाचली जाते. या कहाण्यांतून एखाद व्रत करणं किती कठीण आहे पण ते केल्यावर काय काय मिळेल याची फलश्रुती गोष्टीतून सांगितली असते "कहाणी ऐकल्याचं इतकं फळ तर व्रत ऐकल्याचं किती?"

अश्या वाक्यातून व्रताचा महिमा सांगितला जातो.
अख्या सौरमालेत (आणि आपल्या ज्ञात विश्वात सुद्धा ) फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे .याचं कारण म्हणजे तीचं सूर्यापासूनच योग्य अंतर ,तिचा योग्य आकार ,गुरुत्वाकर्षण, इतर ग्रहांपासूनच सुयोग्य अंतर ..
अख्या सौरमालेत (आणि आपल्या ज्ञात विश्वात सुद्धा ) फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे .याचं कारण म्हणजे तीचं सूर्यापासूनच योग्य अंतर ,तिचा योग्य आकार ,गुरुत्वाकर्षण, इतर ग्रहांपासूनच सुयोग्य अंतर ..
तिचा कललेला आस . परिभ्रमणाचा वेग आणि अश्या बऱ्याच गोष्टी ...यातली एखादी गोष्ट एक जरी कमी जास्त असती तरी पृथ्वीवर जीवन दिसलं नसतं.
एकप्रकारे पृथ्वीचा हा कठीण वसाच आहे . त्याला समर्पित हि कहाणी _/\_