एक होता ध्रुव बाळ. सालस ,समजूतदार ,संस्कारी अगदी गुणी मुलगा! उत्तानपाद राजाचा मुलगा म्हणजे हा राजपुत्र.पण सगळंच गोड गोड असेल तर गोष्ट कशी पूर्ण होणार? ध्रुवाला असते एक सावत्र आई, एकदम दुष्ट आणि कगाज! त्यात राजाची आवडती राणी. एकदा ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला असतो तेव्हा त्याची सावत्र आई रागाने त्याला खाली खेचते आणि म्हणते "इथे बसायचा तुला अधिकार नाही "..
बिचारा ध्रुव रडत आपल्या आई कडे जातो .त्याची निरुपमा रॉय सारखी गरीब आई ..ध्रुवाला म्हणते जा देवाकडून तुझ्यासाठी स्थान माग. ध्रुव मनाशी निश्चय करतो की आपण अशी जागा मिळवायची की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही.
ध्रुव दाट जंगलात जातो .थंडी ऊन वारा पाऊस कसली पर्वा न करता कठोर तपश्चर्या करतो. शेवटी विष्णू प्रसन्न होतात आणि ध्रुवाला प्रलयात सुद्धा हलणार नाही असं "अढळ" स्थान देतात .असा हा ध्रुव बाळ उत्तर दिशेला आज हि त्या स्थानावर बसला आहे . सूर्यचंद्र ,ग्रह,तारे उगवतात मावळात .. धृवाचं स्थान मात्र बदलत नाही
ध्रुवबाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांचीच लहानपणीची आवडती गोष्ट असायची. आजीने सांगितलेल्या या गोष्टीतून "ध्रुव तारा नेहमी एकाच जागी दिसतो " हे खगोलीय सत्य लहानपणापासून आपल्या मनात पक्के व्हायचं

एक कॅमेरा स्टँडवर स्थिर ठेऊन थोड्याथोड्यावेळाने क्लिक केल तर असा फोटो मिळेल यात सगळे तारे उत्तरेला एका ताऱ्याभोवती फिरल्यासारखे दिसतील तोच हा ध्रुव तारा
बारकाईनं पाहिलं तर रात्री जर आपण उत्तर दिशेला क्षितिजापासून साधारण एक वित अंतरावर आपल्याला एक अंधुक तारा दिसतो तो म्हणजे हा ध्रुव. बऱ्याचवेळा आपण ध्रुवबाळाच्या पराक्रमाने इतके भारावून गेलो असतो कि ध्रुवतारा हा तेजस्वीच असला पाहिजे असं समजून व्याध किंवा इतर ताऱ्यांना ध्रुवतारा समजतो.(आणि मग त्याच्या उगवण्या मावळण्या सोबत आपली "उत्तरदिशा" पण बदलते !)खरतर ध्रुवतारा हा सामान्य प्रतीचा तारा आहे .
ध्रुवमत्य तारकासमूहातील अल्फा तारा असणारा ध्रुव आपल्या पासून ४३४ प्रकाशवर्ष अंतरावर आहे . पृथ्वीवरून दिसणाऱ्या तेजस्वी तार्यांची यादी बनवली तर ध्रुवतार्याचा क्रमांक ४५ वा असेल .
आपल्याला डोळ्यांनी दिसताना ध्रुवतारा एक दिसत असला तरी प्रत्यक्षात तो द्वैती तारा आहे.
ध्रुवतारा 'अढळ' का?
ध्रुवतारा आपल्याला उगवताना,मावळताना न दिसता एकाच जागी स्थिर दिसतो याच कारण म्हणजे तो पृथ्वीच्या अक्षावर आहे.

पण समजा आपण वर बघत स्वतःभोवती फेरी मारली तर डोक्यावरचा फॅन आपण कितीही गोल गोल फिरलो तरी कायम दिसत राहील. . फॅन आपल्याला कायम का दिसत असेल? कारण तो आपल्या डोक्यावर आहे
ध्रुवतार्याचं पण अगदी असाच आहे तो पृथ्वीच्या 'डोक्यावर ' म्हणजे अक्षावर आहे .त्यामुळे पृथ्वी कितीही फिरली तरी ध्रुवतारा आपल्याला एकाच जागी दिसतो
म्हणजे पृथ्वीच्या अक्षाजवळचा तारा हा "अढळ" वाटतो . पोलॅरिस हा तारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या अक्षा जवळ आहे .पण पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या अक्षा जवळ असा एकही तारा नाही .त्यामळे दक्षिण गोलार्धात 'ध्रुव'तारा नाही.
गंमत म्हणजे पोलॅरिस हा अगदी त्या अक्षावर नाही .त्याच्या पासून थोडासा लांब आहे .त्यामुळे तो पण अक्षबिंदू भोवती फिरत असतो पण ते अंतर फार कमी असल्याने आपल्या समजत नाही
ध्रुवतारा कसा शोधावा ?
ध्रुवतारा आधीच अंधुक त्यात शहरात प्रकाशाच्या प्रदूषणात बऱ्याचदा तेजस्वी तारे दिसणं पण मुश्किल . हे कमी कि काय म्हणून धृवाचं स्थान बऱ्यापैकी क्षितिजाजवळ . यामुळे बऱ्याचदा शहरातून ध्रुवतारा दिसणं थोडं कठीण होत.अश्यावेळी इतर तारकासमूहांचा उपयोग करून ध्रुवतारा शोधता येतो.
सप्तर्षी वरून ध्रुवतारा शोधता येतो.सप्तर्षींच्या क्रतू आणि पुलह या दोन ताऱ्यांना काल्पनिक रेषेने जोडून ती रेषा साधारण ५ पट वाढवली कि ध्रुवतारा सापडेल. रात्रभर आकाशच निरीक्षण केलं तर सप्तर्षी तारकासमूह ध्रुव भोवती प्रदक्षिणा घातल्या सारखा फिरताना दिसेल . पण प्रत्येकवेळी त्याचे पहिले २ तारे ध्रुवाकडे रोखले असतील.
पण आपल्या कडे साधारण डिसेंबर नंतर सप्तर्षी संध्याकाळी उगवतात . तो पर्यंत M किंवा W आकाराचा शर्मिष्ठा तारकासमूह आपल्या मदतीला येतो .याच्या दोन त्रिकोणा चे काल्पनिक कोन दुभाजक जिथे छेदतात तिथे ध्रुव तारा असतो
शर्मिष्ठा आणि सप्तर्षी एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत .त्यामुळे आकाशात दोघांपैकी एकतरी तारकासमूह असेलच
इतर ग्रहांचे 'ध्रुवतारे'
जस पृथ्वीला पोलॅरिस हा उत्तरी ध्रुव तारा आहे तसा इतर ग्रहानंदेखील त्यांचा ध्रुवतारा असू शकतो .
एखाद्या ग्रहाच्या अक्षाच्या दिशेने जो तारा असेल तो तारा त्या ग्रहाचा 'ध्रुव तारा ' असतो
सूर्यमालेतील पहिला ग्रह म्हणजे बुध. कालेय तारकासमूहातील Omicron Draconis हा तारा बुधाचा उत्तरी ध्रुव तारा आहे तर चित्रफलक तारकासमूहातील अल्फा तारा Alpha Pictoris बुधाचा दक्षिणी ध्रुव तारा आहे.
कालेय तारकासमूहातील 42 Draconis हा तारा शुक्राचा दक्षिणी ध्रुव तारा आहे(शुक्र उलटा असल्याने ) तर असिदंष्ट तारकासमूहातील Eta Doradus हा उत्तरी ध्रुव तारा आहे .
याच तारकासमूहातील डेल्टा तारा Delta Doradus आपल्या चंद्राचा दक्षिणी ध्रुव तारा आहे.
नौशीर्ष तारकासमूहातील Kappa Velorum हा तारा मंगळाच्या दक्षिणी ध्रुव अक्षाजवळ आहे .तर उत्तरी ध्रुव अक्षाजवळ असणारा HD 201834 हा तारा खूपच अंधुक आहे.मंगळाचा उत्तर ध्रुवीय अक्ष हा हंस तारकासमूहातील डेनेब आणि वृषपर्वातील अलडेरामिन या ताऱ्यांच्या मध्यभागी आहे .
कालेय तारकासमूहातील Zeta Draconis हा तारा गुरूच्या उत्तरी अक्षबिंदू पासून २ डिग्री लांब आहे.तर HD ४०४५५ अंधुक तारा दक्षिणी ध्रुव तारा आहे.
शनीला उत्तरी ध्रुवतारा नाही. अष्टक तारकासमूहातील Delta Octantis हा तारा त्याचा दक्षिणी ध्रुव तारा आहे.
नौशीर्ष तारकासमूहातील Gamma Velorum. तारा नेपच्युन चा दक्षिणी ध्रुव तारा आहे तर त्याच्या उत्तरी अक्ष हंस तारकासमूहातील गॅमा आणि डेल्टा ताऱ्यांच्या मध्यावर रोखला आहे.
या ७ ग्रहांचे अक्ष साधारण पणे ३० अंशाच्या आतच कललेले आहेत ,त्यामुळे त्यांचे उत्तरी ध्रुवतारे आपल्या पोलॅरिस च्या आसपासचेच तारे आहेत .पण युरेनस हा ग्रह चक्क आडवा पडलाय त्याचा अक्ष ९७ अंशातून कललेला आहे .त्यामुळे त्याचे ध्रुव तारे इतरांच्या ध्रुवतार्या पासून फार लांब असतील.
भुजंगधारी तारकासमूहातील Eta Ophiuchi तारा युरेनसचा उत्तरी ध्रुव तारा आहे तर मृग तारकासमूहातील 15 Orionis हा दक्षिणी ध्रुव तारा आहे.
No comments:
Post a Comment