Oct 3, 2017

वर्ल्ड स्पेस विक -जागतिक अंतराळ सप्ताह



दरवर्षी जगभर ४ ते १० ऑक्टोंबरच्या दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)साजरा केला जातो.हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सगळ्यात मोठा खगोलीय कार्येक्रम आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये.जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था,खगोलीय संस्था,हौशी मंडळे,शाळा ,महाविद्यालये हा उपक्रम राबवतात.जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून दरवर्षी एक विषय ठरवला जातो.या विषयाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम,स्पर्धा,व्याख्याने ,प्रदर्शन असे विविध कार्येक्रम अगदी जगभर होतात.

इतिहास -
मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या यशानिमित्त अंतराळ सप्ताह साजरा करण्यासाठी १९८०साली "जागतिक अंतराळ सप्ताह संस्था " [World Space Week Association (WSWA) ] स्थापन झाली.जुलै १९८० मध्ये पहिला असा सप्ताह अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे साजरा झाला.१९९९ पर्यंत १५ देशात या कल्पनेचा प्रसार झाला.
६ डिसेंबर १९९९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत असा एक सप्ताह जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यानुसार ४ ते १०ऑक्टोंबर हा आठवडा अंतराळ सप्ताह साजरा करावा असे ठरवण्यात आले.या २ तारखांचे देखील विशेष महत्व आहे. 
४ ऑक्टोंबर १९५७साली तत्कालीन सोव्हियत रशियाने पहिला मानव निर्मित उपग्रह स्पुटनिक-१ अवकाशात पाठवला होता.तर १० ऑक्टोंबर १९६७ साली जगभरातल्या सर्व देशांनी अवकाशाचा उपयोग हा युद्धासाठी नाही तर नेहमी शांतता आणि संशोधनासाठी केला जावा या संकेताला मान्यता दिली होती.२००० साला पासून हा सप्ताह जगभर साजरा केला जातो आहे.२०१६ साली ८६ देशांमध्ये सुमारे २७०० वेगवेगळे कार्येक्रम या निमित्ताने आयोजित केले गेले होते.
सप्ताहाची "थीम"-
जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून  या सप्ताहासाठी दरवर्षी एक विषय ठरवला जातो.
या थीम ला अनुसरून जगभर विविध कार्येक्रमांचे आयोजन होते. 

२००० साली पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजर्या झालेल्या या सप्ताहाचा विषय होता-अंतराळ सहस्रकाचा आरंभ  ("Launching the Space Millennium).२००२ या वर्षीसाठी विषय होता अंतराळ आणि आपले दैनंदिन जीवन.१९५७ साली मानवाने पहिला उपग्रह अवकाशात पाठवल्याच्या घटनेला २००७ साली ५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्यावर्षीचा विषय होता -अंतराळातील 50 वर्षे .
 
२०१५ चा सप्ताह आत्ता पर्यंत लागलेल्या विविध खगोलीय शोधांना समर्पित होता.२०१६ चा विषय होता भविष्याला सक्षम बनवणारे दूरस्थ संवेदन(Remote Sensing – Enabling our Future)  

२००० साला पासून चे वेगवेगळे विषय पुढील प्रमाणे -
२०००-Launching the Space Millennium
२००१- Inspiration from Space
२००२- Space and Daily Life
२००३-Space: Horizon Beyond Earth
२००४-Space for Sustainable Development
२००५- Discovery and Imagination
२००६- Space for Saving Lives
२००७- 50 Years in Space
२००८ -Exploring the Universe
२००९-Space for Education
२०१०-Mysteries of the Cosmos
२०११-50 Years of Human Spaceflight
२०१२-Space for Human Safety and Security
२०१३-Exploring Mars – Discovering Earth
२०१४-Space: Guiding Your Way
२०१५-Discovery
२०१६-Remote Sensing – Enabling our Future


या वर्षी २०१७ सालची थीम आहे -अवकाशात नव्या जगाचा शोध (Exploring New Worlds in Space)


यात प्रामुख्याने अंतराळात  सजीव सृष्टीचा शोध घेण्याचे प्रयत्न ,न्यू होरायझन्स सारखे  अॅस्ट्रोबायोलॉकल  मोहिमा यांच्यावर वर भर असेल . तसेच  पाणी ,धातू ,उर्जा यांसारख्या पृथ्वीवर संपत चाललेल्या  पदार्थाना अंतराळातून पृथ्वीवर आणता येऊ शकेल का ? त्या दृष्टीने कोणत्या मोहिमा सध्या आखल्या गेल्या आहेत  याविषयी देखील चर्चा होईल.  

भारतात इस्रो , विक्रम साराभाई अंतराळ केंद्र,इस्रो इनर्शियल सिस्टम युनिट यासारख्या   अवकाश आणि तंत्रज्ञानाशी सबंधित इतर सरकारी संस्था,विद्यापीठे,हौशी खगोल प्रेमी संस्था ,तारांगणे विविध कार्येक्रमांचे आयोजन केले जाते.नाशिक महानगरपालिका देखील इतर खगोलप्रेमी संस्थांच्या सहकार्याने जागतिक अंतराळ सप्ताहात विविध उपक्रम राबवते .हा सप्ताह  साजरी करणारी नाशिक मनपा ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

सर्व खगोल प्रेमीना जागतिक अंतराळ सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!


Sep 17, 2017

ओळख तारकासमूहांची-सिंह तारकासमूह

सिंह तारकासमूह
८८ तारका समूहांतील खूप मोजके तारका समूह असे आहेत ज्यांचे काल्पनिक आकार  त्यांच्या आकाशातील  आकारात दिसू शकतो. त्यातील एक म्हणजे सिंह तारकासमूह. याच्या ठळक आकारा मुळे हा अगदी सहज ओळखता येतो.
 सिंह हा देखील आयनिक वृत्तावरील  तारका समूह असल्याने  राशी आहे .या या राशीत सूर्य १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असतो. हा १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ वाजता मध्यमंडलावर येतो.याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे.दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.इस पु १०५०० मध्ये वसंत संपात बिंदू सिंह राशीत होता .

स्थान- सिंहाचे स्थान हे आयनिक वृत्त जवळ आहे. यातील प्रमुख तारा मघा हा तर पूर्ण पणे आयनिक वृत्तावर आहे. ह्याची व्याप्ती होरा(Right ascension) ९ ता. १८ मि. ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती(Declination) –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत आहे.

याच्या  पूर्वेला अरुंधती केश,आग्नेयेला कन्या , दक्षिणेला षडंश,नैऋत्येला वासुकी,पश्चिमेला कर्क,वायव्येला गवय,उत्तरेला लघु सिंह हे तारका समूह आहेत. 



आकार -  याने  आकाशाचा ९४७ चौरस अंश भाग व्यापला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत याचा १२ व क्रमांक लागतो . हा तारकासमूह म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून निवांत बसलेला सिंह मानलं जातो.यातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा ताऱ्यांचा  विळा किंवा उलट्या प्रश्न चिन्हासारखा आकार म्हणजे सिंहाचे डोके. तर   बीटा लिओनीस, डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी  तयार होणारा  त्रिकोण म्हणजे सिंहाचा पार्श्वभाग या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून सिंहासारखा आकार होतो.

सिंह कसा ओळखावा -  सिंह आकाशात शोधण्यासठी सुपरिचित सप्तर्षी या तारका समुहाचा उपयोग होतो. सप्तर्षीमधील ज्या पहिल्या२ तार्यांनीआपण ध्रुवतारा शोधतो तीच काल्पनिक रेषाजर  विरुद्ध बाजूला वाढवली तर सिंहापाशी येते .किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर सप्तर्षी हे एक फ्रायिंग पॅन मानलं ज्यात काही तरी शिजतंय .तर या पॅन मधील अन्न थेट सिंहाच्या तोंडात पडेल.


सिंह हा मानवाला खूप आधी पासून परिचित तारका समूह आहे .  मेसोपोटामियन लोकांना हा इ.स.पु. ४००० मध्ये माहित होता असे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत. 
बहुतांश संस्कृतीत याला सिंह हा प्राणी मानलं गेलं आहे.पर्शिअन लोकांनी याला  शेर किंवा सर म्हटल तर बेबेलिओन संस्कृतीत उर्गुला (मोठा सिंह ). चीनि खगोल शास्त्रात यातील वरचे तारे  मिळून पिवळा ड्रॅगन  मानला गेला होता आणि  देनेबोला तारा म्हणजे पिवळा सम्राट ह्यून्गदि. 
 प्राचीन ईजिप्शियन मध्ये सूर्याचा सिंह राशीत  प्रवेश झाल्या नंतर नाईल नदीला पूर यायचा. या पुरातून वाहून आलेल्या सुपीक मातीमुळे पीकपाणी चांगले होत.याच वेळी वाळवंटी सिंह नाईल नदीजवळ दिसायचे त्यामुळे  सिंह  तारकासमूह हा समृद्धीचा प्रतीक मानला गेला 
 ग्रीक पुराण कथांनुसार हर्क्युलस याला  १२ साहसी कामे करायची होती. त्यातील एक म्हणजे अत्यंत विक्राळ नरभक्षक नेमिअन सिंहाला मारणे. या सिंहाची कातडी कुठल्याच  शस्त्राने न भेदली जाऊ शकणारी होती म्हणून हर्क्युलसने त्याला हाताने मारले या पराक्रमाने प्रभावित झ्यूसने त्या सिंहाला सुद्धा आकाशात स्थान दिले.




प्रमुख तारे :सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ दृश्यप्रतीचे चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो. यातील प्रमुख तारे पुढील प्रमाणे -
α Leonis-        रेग्यूलस(Regulus)
β Leonis-         डेनेबोला (Denebola)
γ Leonis-         अल्जीबा (Algieba)
δ Leonis -         झोस्मा(Zosma)
 ξ Leonis -        अल जेनबी (Algenubi)
η Leonis-         अल जबाह(    Al Jabhah)
 ζ Leonis-        अधाफेरा (Adhafera)
μ Leonis-        Rasalas


α Leonis-रेग्यूलस-  हा सिंहेतील सर्वात तेजस्वी तारा असून तो एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा (main-sequence star)आहे.  याची दृश्यप्रत १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. 
हा एक   द्वैतीतारा आहे.द्विनेत्री किंवा २" दुर्बीणीतुन आपल्याला याचा जोडीदार दिसतो. म्हणजे Aआणि B असे हे २ तारे आहेत. मोठ्या दुर्बिणीतून पाहिलं तर याचा जोडीदारB पण द्वैती दिसतो. B हा orange dwarfअसून  C हा Red dwarf आहे. हे २ तारे एकमेकांपासून    2,000 दूर आहेत.

गंमत  म्हणजे A सुद्धा द्वैती आहे पण तो दुर्बिणीतून दिसू शकणार नाही. कारण तो वर्णपटलीय द्वैती आहे .यातील एक तारा blue-white main sequence star  आहे तर दुसरा  white dwarf. थोडक्यात रेग्यूलस हा ४ ताऱ्यांचा समूह आहे .यातील A हा सूर्यापेक्षा  ३.५ पट मोठाअसून  खूप जोरात स्पिन करतो  याचा फिरण्याचा वेग १५. तास आहे यामुळे याचा आकार गोल नसून अंडाकृती आहे . 

β Leonis डेनेबोला -हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.  
 


Aug 15, 2017

पृथ्वीदेवीची कहाणी.......


ऐक देवी पृथ्वी तुझी कहाणी ..........
आटपाट सूर्यमाला होती.तेजस्वी सूर्य मधे तळपत होता .ग्रह गुण्यागोविंदाने भोवती गोल फिरत होते .त्यांचे उपग्रह होते ,काही लघुग्रह होते ...उल्का, धूमकेतू  यांनी घर कसं भरलं होत.

एकच दुःख होतं. कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी नव्हती.जीवसृष्टीसाठी  नियम फार कडक! कोण घेणार हा वसा?

पृथ्वी पुढे आली.  विश्वदेवाला म्हणाली मी घेते हा वसा.....उतशील मातशील... घेतला वसा टाकशील ..
उतणार नाही.... मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. 
बाई ,,बाई ...ठीक आहे.

सूर्यापासून अश्या अश्या अंतरावर जा ...जास्त जवळ जाशील तर भाजशील......जास्त लांब जाशील तर गारठशील .....

 पृथ्वीनं तसं केलं ,योग्य ते  तापमान  मिळालं



 आतला  राग  शांत कर..
पृथ्वीनं लावा शांत केला .....

कठीण पृष्ठभाग मिळाला ,
डोंगर दऱ्या बनले 



गर्वाने जास्त फुगू नको कि निराशेने खंगून जाऊ नको .....
पृथ्वीने तसं केलं, योग्य तो आकार ठेवला,  
योग्य  तेवढं गुरुत्वाकर्षण  मिळालं.......................


 शालीनतेच्या पदर ढळू देऊ नको.....
पृथ्वीनं चुंबकीय क्षेत्राचा पदर ओढला  ....

सौरवातापासून  रक्षण झालं.


सगळ्यांना  धरून  ठेव.......  .पृथ्वीने  वायू  बांधून  ठेवले .
वातावरण  तयार   झाल, पाणी  धरून ठेवलं, समुद्र तयार झाल. 
 अहंकार ठेऊ नको नम्रतेने वाक .... पृथ्वीने तसं केलं ,नम्रतेने २३.५ अंशातून वाकली , पृथ्वीला ऋतुप्राप्ती झाली.

  
स्वतःभोवती फिर, गती काही सोडू नको .......
पृथ्वीने तसं केलं, 
२४ तासातच फिरू लागली ,
 
दिवस आणि  रात्र मिळाली.



 मोठ्यांचा आदर कर ... ...
गुरूला भाऊ मानल ..
उल्कांपासून रक्षण झालं

लहानांना प्रेम दे ... ..... चंद्राला जवळ केलं ...  
भरती-ओहोटीच्या चक्र मिळालं.

पृथ्वीचा वसा पूर्ण झाला ......विश्वदेवता  प्रसन्न झाली ..अंतराळातून एक उल्का आली ,जीवसृष्टीची बीजे ओटीत टाकून गेली..
समुद्राच्या गर्भात वाढू लागली........, चंद्राच्या प्रेमानं भरती आली... त्यानं जीवसृष्टी जमिनीवर आली.

पशु-पक्षी,कीटक झाडे-झुडपे  कीड-मुंगी माणसे  जन्माला आली. पृथ्वीने जीवसृष्टीचा सांभाळ केला.

विश्वदेवता प्रसन्न झाली ..बाई बाई वर माग
स्वतः साठी काही नको ..लेकरांसाठी मागते ..जो कोणी हि कहाणी वाचेल त्याला खगोलशास्त्राच ज्ञान दे ...जीवसृष्टीच्या रक्षणाच भान दे.

 विश्वदेव तथास्तु म्हणाले.

अशी हि साठा उत्तरांची कहाणी  आकाशगंगेच्या पारी ,काळ्याकृष्णविवरी ,तेजोमेघाच्या अंतरी  पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
__________________________________________________

कहाणी हा मराठी लोकवाग्मयातला एक गोड प्रकार . श्रावणात प्रत्येक वाराची.देवाची. सणाची  कहाणी वाचली जाते.  या कहाण्यांतून एखाद व्रत करणं किती कठीण आहे पण ते केल्यावर काय काय मिळेल याची फलश्रुती  गोष्टीतून सांगितली असते "कहाणी ऐकल्याचं इतकं फळ तर व्रत ऐकल्याचं किती?"  
अश्या वाक्यातून व्रताचा महिमा  सांगितला जातो. 

अख्या सौरमालेत (आणि आपल्या ज्ञात विश्वात सुद्धा )  फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे .याचं कारण म्हणजे तीचं सूर्यापासूनच योग्य अंतर ,तिचा योग्य आकार ,गुरुत्वाकर्षण, इतर ग्रहांपासूनच सुयोग्य अंतर .. 
तिचा  कललेला आस . परिभ्रमणाचा वेग आणि अश्या बऱ्याच  गोष्टी ...यातली एखादी गोष्ट  एक जरी कमी जास्त असती तरी पृथ्वीवर जीवन दिसलं नसतं. 
एकप्रकारे पृथ्वीचा हा कठीण वसाच आहे . त्याला समर्पित हि कहाणी  _/\_