Showing posts with label राशी. Show all posts
Showing posts with label राशी. Show all posts

Sep 17, 2017

ओळख तारकासमूहांची-सिंह तारकासमूह

सिंह तारकासमूह
८८ तारका समूहांतील खूप मोजके तारका समूह असे आहेत ज्यांचे काल्पनिक आकार  त्यांच्या आकाशातील  आकारात दिसू शकतो. त्यातील एक म्हणजे सिंह तारकासमूह. याच्या ठळक आकारा मुळे हा अगदी सहज ओळखता येतो.
 सिंह हा देखील आयनिक वृत्तावरील  तारका समूह असल्याने  राशी आहे .या या राशीत सूर्य १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असतो. हा १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ वाजता मध्यमंडलावर येतो.याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे.दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.इस पु १०५०० मध्ये वसंत संपात बिंदू सिंह राशीत होता .

स्थान- सिंहाचे स्थान हे आयनिक वृत्त जवळ आहे. यातील प्रमुख तारा मघा हा तर पूर्ण पणे आयनिक वृत्तावर आहे. ह्याची व्याप्ती होरा(Right ascension) ९ ता. १८ मि. ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती(Declination) –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत आहे.

याच्या  पूर्वेला अरुंधती केश,आग्नेयेला कन्या , दक्षिणेला षडंश,नैऋत्येला वासुकी,पश्चिमेला कर्क,वायव्येला गवय,उत्तरेला लघु सिंह हे तारका समूह आहेत. 



आकार -  याने  आकाशाचा ९४७ चौरस अंश भाग व्यापला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत याचा १२ व क्रमांक लागतो . हा तारकासमूह म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून निवांत बसलेला सिंह मानलं जातो.यातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा ताऱ्यांचा  विळा किंवा उलट्या प्रश्न चिन्हासारखा आकार म्हणजे सिंहाचे डोके. तर   बीटा लिओनीस, डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी  तयार होणारा  त्रिकोण म्हणजे सिंहाचा पार्श्वभाग या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून सिंहासारखा आकार होतो.

सिंह कसा ओळखावा -  सिंह आकाशात शोधण्यासठी सुपरिचित सप्तर्षी या तारका समुहाचा उपयोग होतो. सप्तर्षीमधील ज्या पहिल्या२ तार्यांनीआपण ध्रुवतारा शोधतो तीच काल्पनिक रेषाजर  विरुद्ध बाजूला वाढवली तर सिंहापाशी येते .किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर सप्तर्षी हे एक फ्रायिंग पॅन मानलं ज्यात काही तरी शिजतंय .तर या पॅन मधील अन्न थेट सिंहाच्या तोंडात पडेल.


सिंह हा मानवाला खूप आधी पासून परिचित तारका समूह आहे .  मेसोपोटामियन लोकांना हा इ.स.पु. ४००० मध्ये माहित होता असे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत. 
बहुतांश संस्कृतीत याला सिंह हा प्राणी मानलं गेलं आहे.पर्शिअन लोकांनी याला  शेर किंवा सर म्हटल तर बेबेलिओन संस्कृतीत उर्गुला (मोठा सिंह ). चीनि खगोल शास्त्रात यातील वरचे तारे  मिळून पिवळा ड्रॅगन  मानला गेला होता आणि  देनेबोला तारा म्हणजे पिवळा सम्राट ह्यून्गदि. 
 प्राचीन ईजिप्शियन मध्ये सूर्याचा सिंह राशीत  प्रवेश झाल्या नंतर नाईल नदीला पूर यायचा. या पुरातून वाहून आलेल्या सुपीक मातीमुळे पीकपाणी चांगले होत.याच वेळी वाळवंटी सिंह नाईल नदीजवळ दिसायचे त्यामुळे  सिंह  तारकासमूह हा समृद्धीचा प्रतीक मानला गेला 
 ग्रीक पुराण कथांनुसार हर्क्युलस याला  १२ साहसी कामे करायची होती. त्यातील एक म्हणजे अत्यंत विक्राळ नरभक्षक नेमिअन सिंहाला मारणे. या सिंहाची कातडी कुठल्याच  शस्त्राने न भेदली जाऊ शकणारी होती म्हणून हर्क्युलसने त्याला हाताने मारले या पराक्रमाने प्रभावित झ्यूसने त्या सिंहाला सुद्धा आकाशात स्थान दिले.




प्रमुख तारे :सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ दृश्यप्रतीचे चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो. यातील प्रमुख तारे पुढील प्रमाणे -
α Leonis-        रेग्यूलस(Regulus)
β Leonis-         डेनेबोला (Denebola)
γ Leonis-         अल्जीबा (Algieba)
δ Leonis -         झोस्मा(Zosma)
 ξ Leonis -        अल जेनबी (Algenubi)
η Leonis-         अल जबाह(    Al Jabhah)
 ζ Leonis-        अधाफेरा (Adhafera)
μ Leonis-        Rasalas


α Leonis-रेग्यूलस-  हा सिंहेतील सर्वात तेजस्वी तारा असून तो एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा (main-sequence star)आहे.  याची दृश्यप्रत १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. 
हा एक   द्वैतीतारा आहे.द्विनेत्री किंवा २" दुर्बीणीतुन आपल्याला याचा जोडीदार दिसतो. म्हणजे Aआणि B असे हे २ तारे आहेत. मोठ्या दुर्बिणीतून पाहिलं तर याचा जोडीदारB पण द्वैती दिसतो. B हा orange dwarfअसून  C हा Red dwarf आहे. हे २ तारे एकमेकांपासून    2,000 दूर आहेत.

गंमत  म्हणजे A सुद्धा द्वैती आहे पण तो दुर्बिणीतून दिसू शकणार नाही. कारण तो वर्णपटलीय द्वैती आहे .यातील एक तारा blue-white main sequence star  आहे तर दुसरा  white dwarf. थोडक्यात रेग्यूलस हा ४ ताऱ्यांचा समूह आहे .यातील A हा सूर्यापेक्षा  ३.५ पट मोठाअसून  खूप जोरात स्पिन करतो  याचा फिरण्याचा वेग १५. तास आहे यामुळे याचा आकार गोल नसून अंडाकृती आहे . 

β Leonis डेनेबोला -हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.  
 


Jun 22, 2017

सूर्याचा राशिप्रवेश आणि आकाशदर्शन


आयनिक वृत्तावर असलेल्या तारकासमूहातून म्हणजेच राशींमधून होणाऱ्या सूर्य,चंद्र  यांच्या प्रवासाचा उपयोग कालगणनानेसाठी खूप आदिम काळापासून होतो आहे . एका वर्षात म्हणजे १२ महिन्यात सूर्य १२ राशीमधून भ्रमण करतो. म्हणजे एका राशीत तो एक महिना मुक्कामाला असतो.  

पूर्वी बऱ्याच संस्कृतीतले सणवार ,उत्सव  हे या  सूर्याच्या राशी प्रवेशावर आधारित होते.

आत्ता सुद्धा आपण एक सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या दिवशी  साजरा करतो -तो म्हणजे मकर संक्रांति !
 १४ जानेवारीला  सूर्य  कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. दरवर्षी हा सण १४ (काहीवेळा १५ )
जानेवारीलाच येतो.या वरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि दर महिन्याच्या १४ (किंवा कधी १५) तारखेला सूर्य  एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो .भारतीय संस्कृतीत हा प्रवेश संक्रांत या नावाने ओळखला जातो . हा पर्व काळ मानून दानधर्म इत्यादी सांगितले आहे . मेष संक्रांत , सिंह संक्रांत , कर्क संक्रांत अश्या वर्ष भरातल्या १२ पैकी ११ संक्रांतीचा महत्व कमी होत सध्या पण फक्त मकर संक्रांतच साजरी करतो.

सूर्याचे राशी प्रवेश पुढील प्रमाणे आहेत .
 सूर्याचा हा राशिप्रवेश फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर खगोलीय दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे . आकाश  निरीक्षण करताना  आपल्याला सूर्य कुठल्या राशीत आहे  हे लक्षात ठेवावे लागते .

आपण मेष राशी पासून सुरवात करू-
१४ एप्रिल ला सूर्य मेष राशीत प्रवेश करतो .म्हणजे १४ एप्रिल पासून  हळू हळू  मेष रास सूर्याच्या पार्श्वभूमीवर येईल . यायचं अर्थ  ती सूर्य सोबत उगवेल आणि संध्याकाळी सूर्य सोबत मावळेल आणि म्हणजेच  या काळात आपण मेष रास बघू शकणार नाही !

म्हणजे समजा आपल्याला मेष  आणि त्याच्या आसपास च्या तारकासमूहांचं निरीक्षण करायचे असेल तर ते एप्रिल च्या आधीच करावं लागेल.
पण मग एप्रिल महिन्यात कुठली रास दिसेल ?
किंवा मेष रास आपल्याला रात्रभर  परत कधी बघता येईल?याच उत्तर शोधण्या साठी या[ आपण  पुन्हा  १४ एप्रिल वर येऊ.
या दिवसापासून संध्याकाळी सूर्यास्ताला मेष रास  सूर्यासोबत  पश्चिमेला मावळत असेल आणि त्याचवेळी  पूर्व क्षितिजावर मेषेपासून ६ वि  असणारी कन्या रास उगवत असेल.म्हणजे कन्या रास बघण्याचा सर्वोत्तम कालावधी हा एप्रिल नंतर असेल !

कुठली  रास  मावळत असताना  कुठली  रास  उगवत असेल याच एक ढोबळ  कोष्टक पुढील प्रमाणे :
या कोष्टकात  आपण पाहू शकतो कि १५ नोव्हेंबर नंतर  संध्याकाळी  सूर्य वृश्चिकेत मावळात असताना पूर्वेला मेष  रास उगवत असेल म्हणजे साधारण नोव्हेंबर पासून आपण संध्याकाळ पासून मेष राशीचे  निरीक्षण सुरु करू शकू.
पृथ्वी २४ तासात स्वतःभोवती फिरते .२४/१२ =२ म्हणजे प्रत्येक राशीच्या वाट्याला येतात २ तास म्हणजे पूर्व क्षितिजावर  दर २ तासांनी एक नवीन रास उगवते.

आपण पुन्हा १४ एप्रिलच्या संध्याकाळी येऊ .समजा संध्याकाळी ७ वाजता पश्चिमेला मेष मावळात असताना पूर्वेला  कन्या उगवत असेल .२ तासांनी म्हणजे ९ वाजता  कन्या  साधारण ३०  अंशातून वर आलेली असताना पूर्वेला तूळ रस उगवत असेल . साधारणपणे ११ वाजता वृश्चिक, १ वाजता  धनु , ३ वाजता मकर उगवतील . आणि सूर्योदयाला मीन आणि मेषेचा सीमेवर सूर्य उगवेल.

१५ मे ला ७ वाजता पूर्वेला तुला उगवाच्या २ तास आधीच कन्या उगवलेली असेल त्याच्या २ तास आधी सिंह उगवलेली असणार .म्हणजे मे महिन्यात संध्याकाळी सिंह साधारण डोक्यावर आलेली असणार

एप्रिल मध्यानंतर ७ ला मेष मावल्या नंतर २ तासात वृषभ मावळेल .म्हणजे आपल्याला कृत्तिका तारकापुंज ,रोहिणी तारा , रोहिणीगुच्छ  वैगरे ऑब्जेक्टस बघायचे असतील तर या २ तासत पटकन पाहून घ्यावे लागतील .
एखादा ग्रह सध्या कुठल्या राशीत आहे हे आपल्याला माहित असेल तर ती रस केव्हा-उगवेल  मावळेल या वरून आपण त्या ग्रहाचे निरीक्षणाची   वेळ ठरवू शकतो.

या राशींच्या सोबत  त्यांच्या आजूबाजूचे तारकासमूह पण उगवतील -मावळातील .
१५ एप्रिल नंतर साधारण ९ ला  वृषभ मावळात असताना  पश्चिम  क्षितिजावर मृग, बृहदलुब्धक, मिथुन,सारथी हे तारकासमूह असतील.पूर्वेला कन्या उगवत असताना  भूतप, उत्तर मुकुट वैगरे तारकासमूह असतील. डोक्यावर कर्क,सिंह ,वासुकी,लघुलुब्धक असतील.

म्हणजे आपल्याला सूर्याचा राशिप्रवेश , राशींचा क्रम आणि  प्रत्येक राशीच्या शेजारील तारकासमूहांची माहिती असेल तर आपण कुठल्या वेळी काय दिसेल असा अख्या आकाशाचा अंदाज लावू शकतो  .
____________________________________________________________________



टीप: वरील  माहिती हि ढोबळमानाने वापरता येईल. आपल्याला खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे -
१)३०  हे राशीचे क्षेत्र झाले ,प्रत्यक्षात तो तारकासमूह त्या पेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो
सगळ्या राशींचा आकार सारखा नाही .कन्या,धनु या आकाराने मोठ्या आहेत तर मेष ,कर्क या आकाराने लहान आहेत .त्यामुळे त्यांच्या उगवण्या-मावळ्यांची वेळ २ तासापेक्षा कमी जास्त असू शकते
२) दर महिन्याच्या १४/१५ तारखेला सूर्याचा राशिप्रवेश होतो याचा अर्थ  सूर्य एका राशीतून  दुसऱ्या राशीत टुणकन उडी मारत नाही. दररोज १ अंश असा सरकत सरकत  सूर्याचे भ्रमण  चालते
३) सगळ्या राशी  पूर्णपणे आयनिकवृत्तावर नाही काही त्याच्या वर आहेत तर काही खाली

थोडक्यात आपल्याला  आकाशनिरीक्षण करण्यासाठी या माहितीसोबत थोडं तारतम्य सुद्धा बाळगावं लागेल !






May 3, 2017

राशीचक्र

राशीचक्र म्हटलं  कि आपल्याला शरद उपाध्ये आठवतात आणि मग अमक्या राशीचा माणूस रागीट तमका शंकेखोर किंवा रोज पेपर मध्ये येणार राशी भविष्य हे सगळं डोळ्या समोर येत .
खगोलशास्त्रीय दृष्ट्या राशी म्हणजे काय आणि त्याचे काय महत्व होते ते पण पाहणार आहोत.

उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्यांवर माणसाने आकाशातील ताऱ्यांचे काल्पनिक समूह करून त्यांना काही तरी नावे दिली ज्यांना तारकासमूह म्हटले जाते .हळूहळू माणसाच्या हे लक्षात आले  कि या सगळ्या तारकासमूहांमध्ये काही थोडे तारकासमूह आहेत कि त्याच्यातून सूर्य आणि चंद्राचे भ्रमण होते म्हणजे थोडक्यात काही तारकासमूह हे सूर्याच्या भ्रमण मार्गात आहे .

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य आपल्याला अगदी लहानपणापासून  माहित आहे . पण पृथ्वी वरून निरीक्षण करताना आपल्याला असे भासते कि सूर्य पृथ्वीची प्रदक्षिणा करतो आहे .सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे  पृथ्वी भोवती एक मोठे वर्तुळ आपण मानू  शकतो .

सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे आयनिक वृत्त( Ecliptic) होय अर्थातच हे एक काल्पनिक वर्तुळ  आहे.


चंद्र हा सुद्धा सूर्याच्या या मार्ग जवळूनच भ्रमण करतो .इतकेच काय बाकीच्या ग्रहांचे भ्रमण मार्ग सुद्धा आयनिक वृत्त जवळच आहेत . थोडक्यात हि सगळी मंडळी शाळेत जाणाऱ्या गुणी मुलांसारखी आयनिक वृत्तावरून एका रांगेत जातात . ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह या आयनिकवृत्ताच्या पार्श्वभूमीवर  दिसतात .त्यामुळे सूर्य किंवा चंद्र  आणि इतर ग्रह नेहमी या १२ पैकी कुठल्या तरी एका तारकासमूहातच असतात
या १२ तारकासमूहांना राशी असे म्हटले गेले.ह्या राशी म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन हे तारकासमूह.

राशी हि कल्पना भारतीय नाही .अगदी रामायण-महाभारतात सुद्धा राशींचे उल्लेख नाही . इसपु  पाचव्या सहाव्या शतकात भारतीयाना राशी  कल्पनेशी परिचय झाला असावा.राशी हि कल्पना मुळात सुमेरियन किंवा बॅबिलोनियन लोकांनी प्रचारात आणली असावीत.चीनमध्ये उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढा, वानर, कोंबडा, कुत्रा व अस्वल अशी राशींची नावे होती. आज  प्रचलित असणारी  मेषादि नावे हिपार्कस यांच्या काळात (इ. स. पू. सु. १३०) रूढ झाली.हिपार्कस यांना अकराच राशी माहीत होत्या असे दिसते .पुढे वृश्चिकेतील काही भाग वेगळा करून तूळ हि एकमेव निर्जीव चिन्ह असलेली रास  बनविण्यात आली  असावी .


थोडक्यात राशी म्हणजे फार काही वेगळे नसून ८८ पैकी १२ तारकासमूहांना दिलेला दर्जा आहे . जसं मंत्र्यांना  गाडीवर  लाल दिवा लावून मिरवत येत तसं.आकाशात  इतके सगळे तारकासमूह असताना फक्त या १२ तारकासमूहांनाच इतके महत्व का? याचे ऊत्तर म्हणजे या राशींचा उपयोग करून कालगना करता आली .

वेगवेगळे सणवार साजरे करण्यासाठी, पिकचक्रासाठी शेतसारा इत्यादी भरण्या साठी माणसाला महिना ,वर्ष यांच्या सारखी कालपमापनाची एकक आवश्यक होती . सूर्य आणि चंद्र यांच्या राशी भ्रमणावरून कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले . सूर्य चंद्राच्या राशीन मधील प्रवेशावरून काही अंदाज बांधता येऊ लागले. उदाहरणार्थ  आपल्या कडे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला कि पावसाळा सुरु होतो त्याला अनुसरून शेतकरी शेतीची कामे करीत असत.

या १२ राशींनी आयनिकवृत्ताचा सारखा भाग व्यापलेला नाही . उदाहरणार्थ कन्या हे आकाराने मोठे तारकासमूह आहे तर  कर्क हे लहान.त्यामुळे सूर्य हा कर्क तारकासमुहाजवळ थोडा वेळ दिसेल तर कन्या तारकासमुहाजवळ त्याचे भ्रमण दीर्घ काळ चालेल .एका वर्षात सूर्य १२ राशींचे भ्रमण करतो त्यामुळे कालमापन करण्यासाठी आयनिक वृत्ताचे १२ समान भाग करण्यात आले . ३६०➗१२ = ३० म्हणून आयनिक वृत्ताच्या  ३०° च्या  भागाला एक रास मानले गेले (भलेही  प्रत्यक्षात त्या भागात त्या तारकासमूहाचा किती का हिस्सा असेना ) या मुळे सूर्य  एक महिन्यात एका राशीत असतो आणि त्याने १२ राशी ओलांडल्या कि एक वर्ष होते असे कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले .सूर्य कोणत्या राशीत आहे हे समजले कि आयनिक वृत्तावर तो नेमका कुठे आहे याचा अंदाज  करता येतो . त्यावरून ऋतू , पाऊसपाणी, सणवार इत्यादींचे अंदाज करता  येऊ लागले .

आयनिकवृत्त हे एक वर्तुळ असून राशी म्हणजे ३० चा एक भाग हे आपल्याला समजले .पण आता या राशिचक्राची सुरवात करायची कुठून ? एखाद्या वर्तुळाचे आपल्याला समान १२ भाग करायचे असतील तर वर्तुळावरील एखादा बिंदू आरंभ बिंदू म्हणून घ्यावा लागेल त्याच्या पासून ३०° वर दुसरा बिंदू काढावा लागेल.त्याच्या पासून पुढचा बिंदू ३०° वर असेल.असे १२ भाग आपल्याला काढता येतील .

आयनिकवृत्तावर वसंतसंपातबिंदू हा आरंभ बिंदू मानला गेला . ज्या काळात राशी संकल्पना पुढे येत होती त्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिली शतकात वसंतसंपात बिंदूच्या पार्श्वभूमीवर मेष तारकासमूह होते . त्यामुळे मेष हि पाहिलं  रास ठरली . वसंतसंपात बिंदू पासून पुढचे ३०° इतकी तिची व्याप्ती (प्रत्यक्षात मेष तारकासमूह त्याच्या आधीच संपते )त्याच्या पुढचे ३०° म्हणजे वृषभ रास आणि याप्रमाणे पुढे राशीचक्र तयार होत.
 पृथ्वीच्या परांचांगती मुळे वसंतसंपात बिंदू दरवर्षी ५० कोनीय सेकंदाने मागे जातो.सध्या तो  मिन राशीमध्ये आहे सायन राशी आणि निरयन राशी या वादाचे कारण हेच आहे .या वादात न पडता आकाशनिरीक्षणासाठी आपल्याला निरयन राशी उपयुक्त आहे.

सूर्य चंद्राच्या राशिप्रवेशावरून आपल्याला कोणते तारकासमूह दिसतील याचा अंदाज  बांधता येतो.
उदाहरणार्थ सूर्य १४ एप्रिलला मेषराशी मध्ये प्रवेश करतो त्. १४ एप्रिल नंतर मेष रास सकाळी सूर्य सोबत उगवेल आणि संध्याकाळी सूर्यासोबत मावळेल.यामुळे जर मेष रास बघायची असेल तर ती १४ एप्रिलच्या आधीच पाहावी लागेल . परंतु मेष रास मावळात असताना पूर्वेला कन्या उगवत असेल  आणि ती रात्र भर आकाशात दिसेल. त्यामुळे कन्या रास बघायचा सर्वतोत्तम कालावधी हा एप्रिलच्या मध्यानंतर असेल. पौर्णिमेला चंद्र ज्या राशीत असेल ती रास चंद्र प्रकाशामुळे दिसणार नाही .
तुम्हाला ग्रह शोधायचे असतील तर आकाशात इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही .ग्रह हे नेहमी कुठल्यातरी राशीतच सापडतील . उदाहरणार्थ गुरु हा कधी सप्तर्षीत किंवा मंगळ कधी  नरतुरंग तारकासमूहात दिसणार नाही. त्यामुळे राशी हि संकल्पना समजली तर आकाशनिरीक्षण करणे सोप्पे जाते .

पुढच्यावेळी जेव्हा राशी हा शब्द तुमच्या नजरे समोर येईल तेव्हा भविष्य ,स्वभाव,प्रीती-षडाष्टक असलं काही न आठवता विशाल आयनिक वृत्ताचे १२ भाग आणि त्याच्या पार्श्वभूमीवरचे १२ तारकासमूह तुम्हाला आठवावेत हीच सदिच्छा !!!!!