Sep 17, 2017

ओळख तारकासमूहांची-सिंह तारकासमूह

सिंह तारकासमूह
८८ तारका समूहांतील खूप मोजके तारका समूह असे आहेत ज्यांचे काल्पनिक आकार  त्यांच्या आकाशातील  आकारात दिसू शकतो. त्यातील एक म्हणजे सिंह तारकासमूह. याच्या ठळक आकारा मुळे हा अगदी सहज ओळखता येतो.
 सिंह हा देखील आयनिक वृत्तावरील  तारका समूह असल्याने  राशी आहे .या या राशीत सूर्य १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असतो. हा १५ एप्रिलच्या सुमारास रात्री ९ वाजता मध्यमंडलावर येतो.याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे.दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.इस पु १०५०० मध्ये वसंत संपात बिंदू सिंह राशीत होता .

स्थान- सिंहाचे स्थान हे आयनिक वृत्त जवळ आहे. यातील प्रमुख तारा मघा हा तर पूर्ण पणे आयनिक वृत्तावर आहे. ह्याची व्याप्ती होरा(Right ascension) ९ ता. १८ मि. ते १५ ता. ५६ मि. आणि क्रांती(Declination) –६० ४′ ते + ३३० ३′ या मर्यादेत आहे.

याच्या  पूर्वेला अरुंधती केश,आग्नेयेला कन्या , दक्षिणेला षडंश,नैऋत्येला वासुकी,पश्चिमेला कर्क,वायव्येला गवय,उत्तरेला लघु सिंह हे तारका समूह आहेत. 



आकार -  याने  आकाशाचा ९४७ चौरस अंश भाग व्यापला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत याचा १२ व क्रमांक लागतो . हा तारकासमूह म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून निवांत बसलेला सिंह मानलं जातो.यातील आल्फा, गॅमा, ईटा, झीटा, म्यू आणि एप्सायलॉन लिओनीस या सहा ताऱ्यांचा  विळा किंवा उलट्या प्रश्न चिन्हासारखा आकार म्हणजे सिंहाचे डोके. तर   बीटा लिओनीस, डेल्टा व थीटा लिओनीस या तीन ताऱ्यांनी  तयार होणारा  त्रिकोण म्हणजे सिंहाचा पार्श्वभाग या सर्व नऊ ताऱ्यांचा मिळून सिंहासारखा आकार होतो.

सिंह कसा ओळखावा -  सिंह आकाशात शोधण्यासठी सुपरिचित सप्तर्षी या तारका समुहाचा उपयोग होतो. सप्तर्षीमधील ज्या पहिल्या२ तार्यांनीआपण ध्रुवतारा शोधतो तीच काल्पनिक रेषाजर  विरुद्ध बाजूला वाढवली तर सिंहापाशी येते .किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर सप्तर्षी हे एक फ्रायिंग पॅन मानलं ज्यात काही तरी शिजतंय .तर या पॅन मधील अन्न थेट सिंहाच्या तोंडात पडेल.


सिंह हा मानवाला खूप आधी पासून परिचित तारका समूह आहे .  मेसोपोटामियन लोकांना हा इ.स.पु. ४००० मध्ये माहित होता असे पुरातत्वीय पुरावे मिळाले आहेत. 
बहुतांश संस्कृतीत याला सिंह हा प्राणी मानलं गेलं आहे.पर्शिअन लोकांनी याला  शेर किंवा सर म्हटल तर बेबेलिओन संस्कृतीत उर्गुला (मोठा सिंह ). चीनि खगोल शास्त्रात यातील वरचे तारे  मिळून पिवळा ड्रॅगन  मानला गेला होता आणि  देनेबोला तारा म्हणजे पिवळा सम्राट ह्यून्गदि. 
 प्राचीन ईजिप्शियन मध्ये सूर्याचा सिंह राशीत  प्रवेश झाल्या नंतर नाईल नदीला पूर यायचा. या पुरातून वाहून आलेल्या सुपीक मातीमुळे पीकपाणी चांगले होत.याच वेळी वाळवंटी सिंह नाईल नदीजवळ दिसायचे त्यामुळे  सिंह  तारकासमूह हा समृद्धीचा प्रतीक मानला गेला 
 ग्रीक पुराण कथांनुसार हर्क्युलस याला  १२ साहसी कामे करायची होती. त्यातील एक म्हणजे अत्यंत विक्राळ नरभक्षक नेमिअन सिंहाला मारणे. या सिंहाची कातडी कुठल्याच  शस्त्राने न भेदली जाऊ शकणारी होती म्हणून हर्क्युलसने त्याला हाताने मारले या पराक्रमाने प्रभावित झ्यूसने त्या सिंहाला सुद्धा आकाशात स्थान दिले.




प्रमुख तारे :सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ दृश्यप्रतीचे चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो. यातील प्रमुख तारे पुढील प्रमाणे -
α Leonis-        रेग्यूलस(Regulus)
β Leonis-         डेनेबोला (Denebola)
γ Leonis-         अल्जीबा (Algieba)
δ Leonis -         झोस्मा(Zosma)
 ξ Leonis -        अल जेनबी (Algenubi)
η Leonis-         अल जबाह(    Al Jabhah)
 ζ Leonis-        अधाफेरा (Adhafera)
μ Leonis-        Rasalas


α Leonis-रेग्यूलस-  हा सिंहेतील सर्वात तेजस्वी तारा असून तो एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा (main-sequence star)आहे.  याची दृश्यप्रत १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. 
हा एक   द्वैतीतारा आहे.द्विनेत्री किंवा २" दुर्बीणीतुन आपल्याला याचा जोडीदार दिसतो. म्हणजे Aआणि B असे हे २ तारे आहेत. मोठ्या दुर्बिणीतून पाहिलं तर याचा जोडीदारB पण द्वैती दिसतो. B हा orange dwarfअसून  C हा Red dwarf आहे. हे २ तारे एकमेकांपासून    2,000 दूर आहेत.

गंमत  म्हणजे A सुद्धा द्वैती आहे पण तो दुर्बिणीतून दिसू शकणार नाही. कारण तो वर्णपटलीय द्वैती आहे .यातील एक तारा blue-white main sequence star  आहे तर दुसरा  white dwarf. थोडक्यात रेग्यूलस हा ४ ताऱ्यांचा समूह आहे .यातील A हा सूर्यापेक्षा  ३.५ पट मोठाअसून  खूप जोरात स्पिन करतो  याचा फिरण्याचा वेग १५. तास आहे यामुळे याचा आकार गोल नसून अंडाकृती आहे . 

β Leonis डेनेबोला -हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.  
 


Aug 15, 2017

पृथ्वीदेवीची कहाणी.......


ऐक देवी पृथ्वी तुझी कहाणी ..........
आटपाट सूर्यमाला होती.तेजस्वी सूर्य मधे तळपत होता .ग्रह गुण्यागोविंदाने भोवती गोल फिरत होते .त्यांचे उपग्रह होते ,काही लघुग्रह होते ...उल्का, धूमकेतू  यांनी घर कसं भरलं होत.

एकच दुःख होतं. कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी नव्हती.जीवसृष्टीसाठी  नियम फार कडक! कोण घेणार हा वसा?

पृथ्वी पुढे आली.  विश्वदेवाला म्हणाली मी घेते हा वसा.....उतशील मातशील... घेतला वसा टाकशील ..
उतणार नाही.... मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. 
बाई ,,बाई ...ठीक आहे.

सूर्यापासून अश्या अश्या अंतरावर जा ...जास्त जवळ जाशील तर भाजशील......जास्त लांब जाशील तर गारठशील .....

 पृथ्वीनं तसं केलं ,योग्य ते  तापमान  मिळालं



 आतला  राग  शांत कर..
पृथ्वीनं लावा शांत केला .....

कठीण पृष्ठभाग मिळाला ,
डोंगर दऱ्या बनले 



गर्वाने जास्त फुगू नको कि निराशेने खंगून जाऊ नको .....
पृथ्वीने तसं केलं, योग्य तो आकार ठेवला,  
योग्य  तेवढं गुरुत्वाकर्षण  मिळालं.......................


 शालीनतेच्या पदर ढळू देऊ नको.....
पृथ्वीनं चुंबकीय क्षेत्राचा पदर ओढला  ....

सौरवातापासून  रक्षण झालं.


सगळ्यांना  धरून  ठेव.......  .पृथ्वीने  वायू  बांधून  ठेवले .
वातावरण  तयार   झाल, पाणी  धरून ठेवलं, समुद्र तयार झाल. 
 अहंकार ठेऊ नको नम्रतेने वाक .... पृथ्वीने तसं केलं ,नम्रतेने २३.५ अंशातून वाकली , पृथ्वीला ऋतुप्राप्ती झाली.

  
स्वतःभोवती फिर, गती काही सोडू नको .......
पृथ्वीने तसं केलं, 
२४ तासातच फिरू लागली ,
 
दिवस आणि  रात्र मिळाली.



 मोठ्यांचा आदर कर ... ...
गुरूला भाऊ मानल ..
उल्कांपासून रक्षण झालं

लहानांना प्रेम दे ... ..... चंद्राला जवळ केलं ...  
भरती-ओहोटीच्या चक्र मिळालं.

पृथ्वीचा वसा पूर्ण झाला ......विश्वदेवता  प्रसन्न झाली ..अंतराळातून एक उल्का आली ,जीवसृष्टीची बीजे ओटीत टाकून गेली..
समुद्राच्या गर्भात वाढू लागली........, चंद्राच्या प्रेमानं भरती आली... त्यानं जीवसृष्टी जमिनीवर आली.

पशु-पक्षी,कीटक झाडे-झुडपे  कीड-मुंगी माणसे  जन्माला आली. पृथ्वीने जीवसृष्टीचा सांभाळ केला.

विश्वदेवता प्रसन्न झाली ..बाई बाई वर माग
स्वतः साठी काही नको ..लेकरांसाठी मागते ..जो कोणी हि कहाणी वाचेल त्याला खगोलशास्त्राच ज्ञान दे ...जीवसृष्टीच्या रक्षणाच भान दे.

 विश्वदेव तथास्तु म्हणाले.

अशी हि साठा उत्तरांची कहाणी  आकाशगंगेच्या पारी ,काळ्याकृष्णविवरी ,तेजोमेघाच्या अंतरी  पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
__________________________________________________

कहाणी हा मराठी लोकवाग्मयातला एक गोड प्रकार . श्रावणात प्रत्येक वाराची.देवाची. सणाची  कहाणी वाचली जाते.  या कहाण्यांतून एखाद व्रत करणं किती कठीण आहे पण ते केल्यावर काय काय मिळेल याची फलश्रुती  गोष्टीतून सांगितली असते "कहाणी ऐकल्याचं इतकं फळ तर व्रत ऐकल्याचं किती?"  
अश्या वाक्यातून व्रताचा महिमा  सांगितला जातो. 

अख्या सौरमालेत (आणि आपल्या ज्ञात विश्वात सुद्धा )  फक्त पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे .याचं कारण म्हणजे तीचं सूर्यापासूनच योग्य अंतर ,तिचा योग्य आकार ,गुरुत्वाकर्षण, इतर ग्रहांपासूनच सुयोग्य अंतर .. 
तिचा  कललेला आस . परिभ्रमणाचा वेग आणि अश्या बऱ्याच  गोष्टी ...यातली एखादी गोष्ट  एक जरी कमी जास्त असती तरी पृथ्वीवर जीवन दिसलं नसतं. 
एकप्रकारे पृथ्वीचा हा कठीण वसाच आहे . त्याला समर्पित हि कहाणी  _/\_
 

Jul 25, 2017

ओळख तारकासमूहांची-वृषभ तारकासमूह

वृषभ तारकासमूह
वृषभ तारकासमूह(Taurus) हा एक प्रमुख आणि ठळकपणे ओळखता येणारा तारकासमूह आहे. हा  आयनिक वृत्तावरील दुसऱ्या क्रमांकाचा तारकासमूह असून याने आकाशाचा ७९७ चौरस अंश भाग व्यापला आहे.नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात हा रात्रभर आकाशात दिसू  शकतो. वृषभ हा आयनिक वृत्तावर असल्याने हा राशीचक्रातील एक zodiac constellation आहे.
निरयन वृषभ राशीत  सूर्य १४ मे ते १४ जूनपर्यंत असतो. इ. स. पू. ४५५० ते १८५० दरम्यान वसंत संपात वृषभ राशीत होता .




















वृषभ हा माणसाला अगदी अश्मयुगापासून माहित असलेला  तारकासमूह आहे . फ्रांस जवळील लास्को  (Lascaux) येथे एका गुहेत उत्तर पुराश्मयुगीन  भित्तिचित्रे आढळलीआहेत . या चित्रात आदिमानवाने  वृषभ तारका समूह ,त्याचा बैलाचा काल्पनिक आकार , जवळ कृत्तिकेच्या ७ चांदण्या अगदी ठळकपणे दाखवले आहे .हि चित्रे इ.स.पु १७,३०० इतकी जुनी आहेत.
यावरून अगदी नवाश्मयुगापासून या तारकासमूहाला काल्पनिक बैल मानलं गेलं आहे असं दिसतंय.
याच्या V सारख्या आकारात बैलाची शिंग आणि उरलेला भाग बैलाचा चेहरा अशी सहज कल्पना करता येते . त्यामुळे बहुतांश संस्कृतीत याचा संबंध बैल ,शेती याच्याशी जोडलेला आढळतो .

   स्थान -  या तारकासमूहातून आयनिक वृत्त जाते आणि  आपली आकाशगंगा याच्या पूर्वेकडून गेलेली दिसते याचे विषुवांश(Right ascension) ४ ता. २० मि. व क्रांती(Declination) + १६0 आहेत. याच्या पूर्वेला मिथुन ,आग्नेयेला मृग , दक्षिणेला यमुना ,नैऋत्येला तिमिन्गल,पश्चिमेला मेष,,वायव्येला ययाती,उत्तरेला सारथी हे तारका समूह आहेत.

आकार आणि क्षेत्रफळ-  याने  आकाशाचा ७९७ चौरस अंश भाग व्यापला आहे.



वृषभ कसे शोधावे -  हा तारका समूह शोधण्यासाठी आपल्याला मृग या तारका समुहाचा उपयोग होतो. मृगाच्या पोटातील  प्रमुख तीन तारे अगदी सहज दिसतात.
 हि काल्पनिक रेषा एका बाजूला व्याधाच्या अत्यंत तेजस्वी तार्या पर्यंत जाते . तीच काल्पनिक रेषा विरुद्ध बाजूस वृषभेतील  तेजस्वी रोहिणी तार्या पर्यंत येते . 
एकदा रोहिणी तारा सापडला कि त्याच्या सभोवताली V या अक्षरासारखा ठळक आकार दिसायला लागतो. शहरा पासून लांब अगदी अंधार्या आकाशात पाहिलं तर या  V ची एक बाजू थेट सारथी तारका समुहाला  जाऊन भिडलेली दिसते. 
व्याध -मृगाचा बाण - रोहिणी  हि काल्पनिक रेषा अजून थोडी वाढवली कि एक तार्यांचा पुंजका दिसतो .तो म्हणजे कृत्तिका तारकापुंज.

दंतकथा-
या तारकासमूहाला जवळपास सगळ्याच संस्कृतीत बैल मानले आहे .मेसोपोटामियनलोकांनी याला स्वर्गीय बैल म्हटले तर इजिप्शियन लोकांनी पुनर्जन्माचा कारक पवित्र बैल. आपल्या  पूर्वजांना हा एक छकडा वाटलं म्हणून याचा उल्लेख रोहिणी शकट असा होतो.चीनी लोकांनी याला पांढरा वाघ मानलं .एका ग्रीक कथेप्रमाणे हर्कुलीस ने मारलेला बैल म्हणजे हा वृषभ होय.

 ग्रीक संस्कृतीत  आणखी  एक कथा आढळते . देवांचा राजा झिउस याचे फिनीशिया ची  राजकन्या युरोपा हिच्या वर प्रेम जडले . तिला वश करण्यासाठी त्याने एका  पांढर्या शुभ्र ,धिप्पाड बैलाचे रूप घेतले आणि तिच्या समोर उभा राहिला.
 राजकन्येला बैल इतका आवडला कि ती त्यावर स्वार झाली .लगेच या बैलाने आकाशात उड्डाण केले आणि राजकन्येला घेऊन तो क्रीट बेटावर जाऊन उतरला. तिथे झिउस ने आपले खरे रूप प्रकट केले .तो बैल म्हणजे वृषभ. समुद्रातून जाताना त्या दैवी बैलाचे  फक्त तोंडच दिसत होते म्हणून वृषभ तारकासमुहात फक्त बैलाचे शीर्ष आहे पूर्ण बैल नाही.

भारतीय संकल्पना -
वृषभेतील सगळ्यात तेजस्वी तारा अल्देबरान म्हणजे भारतीय रोहिणी नक्षत्र.आपल्या पौराणिक साहित्यामध्ये चंद्र हा रोहिणीचा पती असल्याचे वर्णन आढळते.प्रजापतीने प्रथम विराट नावाची स्त्री उत्पन्न केली. पण हिला यज्ञात योग्य तो मान न मिळाल्यामुळे ती उंच आकाशात गेली. उंच चढत जाणारी, आरोहण करणारी या अर्थाने तिचे नाव रोहिणी पडले.
रोहिणीच्या पुढे एक खुला तारकागुच्छ दिसतो तो म्हणजे कृत्तिका नक्षत्र .याना सप्तर्षींच्या पत्नी मानले जाते .

महत्वाचे तारे-
α-  अल देबरान  हा या तारका समुहातील तेजस्वी अल्फा तारा.हा एक नारंगी ताबंडा महातारा (Red giant)असून त्याचा  व्यास सूर्याच्या व्यासाच्या ५६ पट आहे. ६८ प्रकाशवर्ष दूर असणार्या या तार्याची दृश्य प्रत ०.८७ आहे. या तार्याचे स्थान चंद्राच्या भ्रमण मार्गात आहे . त्यामुळे चंद्र रोहिणीचे बऱ्याच वेळेस पिधान करतो . रोहिणी तेजस्वी असल्याने  चंद्र जवळ येईपर्यंत ती दिसत असते. त्यामुळे हे  पिधान सुंदर दिसतें. 

β-अलनाथ  नावाचा हा तारा या  समूहातील दुसरा तेजस्वी तारा आहे. हा आपल्या पासून १३० प्रकाशवर्ष दूर आहे.

अवकाशस्थ पदार्थ -
रोहिणी गुच्छ- हायडेज क्लस्टर  या नावाने ओळखला जाणारा हा एक  खुला तारकागुच्छ आहे . १३० प्रकाश वर्ष दूर असणार्या या तारका गुच्छात २५९ तारे आहेत याचा व्यास ८० प्रकाशवर्ष इतका आहे.

कृत्तिका गुच्छ/( M45)/ (Pleiades)-हा साध्या  डोळ्याने दिसू शकणारा तारकागुच्छ आहे. हा तारकागुच्छ  दुर्बिणीतून खूप सुंदर दिसतो . यातील २५० ताऱ्यांपैकी  ६ तारे डोळ्याने दिसतात तर ७५ तारे दुर्बिणीतून सहज दिसू शकतात. भारतीय परंपरेत याला कृत्तिका नक्षत्र मानले असून यातले ६ तारे हे  अंबा, दुला ,नितंती ,मेघदन्ति,अभ्रयन्ति ,वर्षायन्ति या सप्तर्षींच्या पत्नी असणार्या  ६ कृत्तिका आहेत सप्तर्षींनी रागाने कृत्तिकांचे तोंड न पाहण्याचे ठरविले .निरीक्षण केल्यास आपणास दिसेल की कृत्तिका आकाशात मावळण्यासाठी पश्चिमेकडे सरकल्या शिवाय सप्तर्षी उगवत नाहीत.
कर्क तेजोमेघ /(M1)/(Crab Nebula)/Taurus A- हा एक अत्यंत सुंदर  तेजोमेघ आहे . हा  तेजोमेघ ४ जुलै १०५४ साली झालेल्या अतिनवतार्याचे अवशेष (supernova remnant)आहेत.याचा व्यास ६ प्रकाश वर्ष असून आपल्या पासून तो ६३०० प्रकाशवर्ष दूर आहे.


NGC 1647-हा ३० तार्यांचा  एक खुला तारकागुच्छ  असून ४०० प्रकाशवर्ष दूर आहे.

वृषभस्थ उल्कावर्षाव (Taurids)- वृषभ तारकासमूहातून २० आक्टोबर ते १० डिसेम्बर दरम्यान वार्षिक उल्कावर्षाव होतो.१२ नोव्हेंबर ला सर्वोच्च वर्षाव होतो. याला हालोविन फायरबॉल असेही म्हटले जाते . एनके नावाचा धुमकेतू या  उल्कावर्षावाचे कारण आहे