Jul 11, 2017

खगोलविदांची “सरस्वती"-१



पा॒व॒का नः॒ सर॑स्वती॒ वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती । य॒ज्ञं व॑ष्टु धि॒याव॑सुः ॥
चो॒द॒यि॒त्री सू॒नृता॑नां॒ चेत॑न्ती सुमती॒नाम् । य॒ज्ञं द॑धे॒ सर॑स्वती ॥
म॒हो अर्णः॒ सर॑स्वती॒ प्र चे॑तयति के॒तुना॑ । धियो॒ विश्वा॒ विरा॑जति ॥ 

                                                     (ऋग्वेद मंडळ १ ,सुक्त ३ ,ऋचा १० ते १२ )

सारांश-  सगळ्या जगाला आपल्या ज्ञानाने शुद्ध  करणारी (पावका),अपार बुद्धी सामर्थ्य असणारी (वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती) हे विश्व काय आहे ?त्याचे सत्य काय आहे?हे जाणून घेण्याची  नेहमी प्रेरणा देणारी (चोदयित्री सुनृतानाम् ) स्वतःच्या बुद्धीने वागणाऱ्या  बुद्धीजीवी लोकांची मार्गदर्शक (चेत॑न्ती सुमती॒नाम् ),
ज्ञान हे सागरा प्रमाणे अथांग आहे याची जाणीव करून  देणारी (म॒हो अर्णः॒ प्र चे॑तयति)  या विश्वात जिथे जिथे बुद्धी, नवीन जाणून घेण्याची वृत्ती आढळते तेथें तेथें साम्राज्य करणारी( धियो॒ विश्वा॒ विरा॑जति) हि ज्ञानाची अधिष्टात्री ( धि॒याव॑सुः)   देवी सरस्वती , हिने आम्ही मांडलेला हा ज्ञान यज्ञ स्वीकार केला आहे !

 ऋग्वेदाच्या  फक्त याच नाही तर अनेक ऋचांमध्ये सरस्वतीची स्तुती आढळते . ऋग्वेदाच्या सगळ्या मंडळात (४थे सोडून) सरस्वतीच्या स्तवनपर ,ऋचा आहेत मण्डल ६ सूक्त ६१ सारखी अनेक सुक्त तर खास सरस्वती सूक्ते आहेत .या प्रत्येक सूक्तांत  सरस्वतीला बुद्धी,ज्ञान ,प्रेरणा.शोधक वृत्ती यांची अधिष्टात्री मानून हे विश्व कसे जन्माला आले ?याचे स्वरूप काय? या विश्वात आमचे स्थान काय? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी देवी सरस्वतीने आम्हाला प्रेरणा द्यावी अशी प्रार्थना केलेली आढळते.

या विश्वाच्या उत्पती बद्दल ,स्वतःच्या अस्तित्व बद्दल माणसाला अगदी पूर्वी पासून कुतूहल आहे . याच कुतूहलामुळे “सूर्य रोज का उगवतो “ इथ पासून तर “हे विश्वाच कोणी तयार केले" यासारखे अनेक प्रश्न मानवाला पडले.
माणसाच्या या शोधक वृत्तीला सगळ्याच धर्मानी एक उत्तर देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला”हे विश्व परमेश्वरानी निर्माण केले “ विषय संपला !  एकदा का परमेश्वराला विश्वाचा निर्माता घोषित केलं कि पुढचे प्रश्न विचारणं हे धर्मद्रोही ठरतं.

पण “पोथी वाक्यं प्रमाणं “ च्या कातळावर सुद्धा कुतूहलाचा अंकुर तग धरून टिकला . याचा प्रत्यय आद्य ग्रंथ ऋग्वेदात वारंवार येतो . नासदीय सूक्ता सारख्या सुक्तातून एखादा ज्ञानोपासक ऋषी विश्वाच्या निर्मितीच्याही आधी काय होत याचा ठाव घेतो . हि शोध घेण्याची वृत्ती ,बुद्धिप्रामाण्यवाद , ज्ञानजिज्ञासा आमच्यात सतत राहो हि प्रार्थना या ऋषींनी केलेली दिसते . आणि याच  विजुगीषेचे प्रतिक मानली गेली “सरस्वती"!

याच परंपरेत कणाद येतो जो विश्वातील प्रत्येक गोष्ट  अणूंपासून बनली असेल असा सिद्धांत मांडतो. याच परंपरेत लघाद मुनी येतात ज्यांनी इसपू १५०० मध्ये वेदांग ज्योतिष सारखा ग्रंथ लिहिला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगणारा आर्यभट्ट याच परंपरेचा अनुयायी. वराहमिहिर,भास्कराचार्य या आद्य खगोलविदांपासून तर इस्रो ,आयूका मधल्या आजच्या वैज्ञानिकांपर्यंत ची मंडळी याच परंपरेचे पाईक.

याच  परंपरेचे पुढचे वारसदार म्हणजे पुण्यातील 'आयुका' आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांचे एक पथक.या शास्त्रज्ञांच्या चमूने नुकताच एक शोध प्रकाशित केला ज्यामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.आपल्या पासून ४अब्ज प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या दीर्घिकांच्या एका प्रचंड समूहांचा शोध घेण्यात  त्यांना  यश आलं.
त्यांच्या सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी होते. गेली १५ वर्षे हे  शास्त्रज्ञ संशोधन करीत होते.खगोलीय हालचालींवर लक्ष ठेवून होते,नोंदी घेत होते,चर्चा करीत होते-,सिद्धांत मांडत होते.
 या सगळ्या संशोधनातून जेव्हा दीर्घिकांच्या समूहांचे  निश्चित  स्थान , त्याची रचना ,पृथ्वीपासूनचे अंतर निश्‍चित झाले तेव्हा  हा शोध जाहीर करण्यात आला.
या दीर्घिका समूहाला त्यांनी नाव दिले ‘सरस्वती’!!   ऋग्वेदातल्या त्या आद्य सुक्त कर्त्यापासून तर आत्ताच्या आधुनिक भारतीय वैज्ञानिकांपर्यंतच्या ज्ञात-अज्ञात भारतीय खगोलविदांचा यातून सन्मान झाला असे आपण म्हणू शकतो!

1 comment: