Apr 27, 2017

आपला "वैश्विक पत्ता"

आपला  वैश्विक पत्ता
"तुम्ही कुठे राहतात ?"असं कोणी आपल्याला विचारल तर हा प्रश्न कुठे विचारला गेला आहे  त्याप्रमाणे आपण आपला पत्ता सांगतो.उदाहरणार्थ आपल्याच बिल्डिंग मध्ये येऊन एखाद्याने विचारल तर आपण  फक्त फ्लॅट नं सांगू.आपल्या  एरियात कोणी  विचारलं तर बिल्डिंगच नाव सांगू .दुसऱ्या भागात असू तर आपल्या एरियाच नाव सांगू .दुसऱ्या शहरात असू तर आपल्या शहराचं नाव सांगू .आणि कोणी विदेशात हा प्रश्न विचारला तर भारतात राहतो असं सांगू ?
थोडक्यात काय तर हा प्रश्न विचारणाऱ्याच आपल्या सापेक्ष भौगोलिक स्थान काय यावरून आपण आपल्या पत्त्याची व्याप्ती वाढवतो.आपल्या बिल्डिंगमध्ये आलेल्या पोस्टमन ला फक्त फ्लॅट नं सांगणं पुरेसं आहे तर अमेरिकेतल्या ऑनलाईन मित्राला भारत-महाराष्ट्र-नाशिक अस सांगाव लागेल.

पण समजा एखाद्या परग्रहवासियाने आपल्याला हाच प्रश्न विचारला तर ??? सोप्पंय कि त्याला सांगायचं पृथ्वी !  म्हणजे आपला वैश्विक पत्ता झाला पृथ्वी!

पण जर तो आपल्या सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावरचा असला  तरच त्याला पृथ्वी माहित असेल.
आपली पृथ्वी हि सूर्यमालेच्या घटक आहे .सूर्य या ताऱ्या भोवती फिरणारे खगोलीय घटक म्हणजे सूर्यमाला. यात ८ प्रमुख ग्रह ,त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ नैसर्गिक उपग्रह, प्लूटो सारखे ५ बटु ग्रह , अनेक उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
म्हणजे आता आपला पत्ता झाला सूर्यमाला-पृथ्वी!


पण आपली सूर्यमाला "मंदाकिनी "/आकाशगंगा (Milky Way Galaxy) या दीर्घिकेत आहे .आपल्या या दीर्घिकेत असे  साधारण २०० अब्ज तारे आहेत .या ताऱ्यांच्या आपल्या आपल्या ग्रहमाला असतील .या व्यतिरिक्त आकाशगंगेत अनेक तेजोमेघ ,तारकागुच्छ ,आंतरतारकीय द्रव्य, उष्ण वायू, धूलिकण आहेत.आपली आकाशगंगा  सर्पिलाकार आहे. म्हणजे तिच्या केंद्रापासून अनेक भुजा निघतात(दिवाळीतल्या भुईचक्र सारखं) यातल्या मृग नावाच्या उप-भुजेत आपली सूर्यमाला आहे. याचे स्थान धनु भुजा आणि ययाती भुजेच्या मध्ये आहे .आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून साधारण २६००० प्रकाशवर्ष दूर आहे .
म्हणजे आता आपला  पत्ता झाला  मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी.



अवकाशात दीर्घिका या एकट्याने न आढळता समूहाने असतात. आपली दीर्घिका "आकाशगंगा" सुद्धा  एका दीर्घिका समूहाचा भाग आहे . याला स्थानिक दीर्घिका समूह (Local Group) म्हणतात .या समूहात ५४ दीर्घिका असून बहुतेक लघुदीर्घिका आहेत. आपली आकाशगंगा ,देवयानी आणि  ट्राऐन्गुलम या आकाराने मोठ्या असणाऱ्या सर्पिलाकार दीर्घिका आहेत. देवयानी हि आकाराने सगळ्यात मोठी आहे. या समूहाचा व्यास साधारण १ करोड  प्रकाशवर्ष इतका आहे .
म्हणजे आता आपला पत्ता झाला स्थानिक समूह-मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी  !


 पण हा स्थानिक समूह एका मोठ्या दीर्घिकीय समूहाचा भाग आहे. ज्याला  कन्या महासमूह(Virgo Supercluster) या नावाने ओळखले जाते .यात १०० हुन अधिक दीर्घिकीय समूह आहेत . आपल्याला पृथ्वीवरून कन्या तारकासमूहात दिसणारा दीर्घिकांचा समूह "कन्या दीर्घिकीय समूह "(Virgo cluster)या मोठ्या महासमूहाच्या केंद्रभागी आहे .म्हणजे आता आपला पत्ता झाला-कन्या महासमूह -स्थानिक दीर्घिकीय समूह-मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी  

विश्वाची व्याप्ती अनंत आहे .जशी जशी आपली वैज्ञानिक प्रगती होते तशी तशी आपल्याला विश्वाचा हा अनंत पसारा समजत जातो .२०१४ मध्ये आपल्याला समजले कि कन्या महासमूह हा एका बृहत महासमूहाचा भाग आहे .याला लानीआकिया महासमूह (Laniakea Supercluster) या नावाने ओळखले जाते .लानीआकिया  या हवाई भाषेतील शब्दाचा अर्थ होतो अपरिमित ब्रह्माण्ड . या बृहत महासमूहात आपल्या कन्या महासमुहासारखे वासुकी महासमूह(Hydra Supercluster),नरतुरंग महासमूह असे अनेक दीर्घिकीय महासमूह आहेत .
म्हणजे आता आपला पत्ता झाला
लानीआकिया बृहत महासमूह -कन्या महासमूह -स्थानिक दीर्घिकीय समूह-मंदाकिनी दीर्घिका- सूर्यमाला-पृथ्वी



पण विश्वाची व्याप्ती या पेक्षाही खूप प्रचंड मोठी आहे .लानीआकिया सारखे शौरी महासमूह(Hercules Supercluster) ,महाश्व-मिन महासमूह(Perseus-Pisces Supercluster) ,कोमा महासमूह (Coma Supercluster) असे अनेक महासमूह आहेत. जसे जसे आपल्याला आपले विश्व उमजत जाईल तस तस  आपल्या वैश्विक पत्त्यात नवीन स्थानांची भर पडेल. अर्थातच हा "वैश्विक पत्ता " इतर कुठल्या दीर्घिकीय समूहात राहणाऱ्या एलियन ला सांगून पण कळणार नाही कारण हि सगळी आपण दिलेली नाव आहेत . पण या अभ्यासातून आपल्याला विश्व  किती अमर्याद आहे आणि त्या पुढे आपण किती नगण्य हे समजत जाते . या व्यापकते पुढे आपल्या पृथ्वीवरचे प्रांतवाद ,राष्ट्रवाद ,इतकाच काय तर 'मानवता ' वैगरे शब्द पण खुजे वाटतात !


अवांतर : आपल्या संस्कृतीत पूजा करताना संकल्प सोडला जातो. त्यात अखिल ब्रह्माण्डाच्या अधिपती परमेश्वराला आपण त्याच्या अमर्याद ब्रह्माण्डातून नेमके  कुठून पूजा करतो आहोत हे कळावे म्हणून "देशकालसंकीर्तन " म्हणे आपल्या स्थानाचा उल्लेख करून संकेला जातो..भरतवर्षे  जम्बुद्वीपे   दंडकारण्ये गोदावर्या दक्षिणतीरे नाशिक क्षेत्रे .... वैगरे .  
आपल्या पूर्वजांना विश्वाविषयी मर्यादित ज्ञान असल्याने त्यांनी पृथ्वी हा मोठा घटक मानला .आता आपल्याला ज्ञात व्याप्ती प्रमाणे संकल्प बदलायला हरकत नसावी !
"कन्या महासमुहे स्थानीय दीर्घिकासमुहे मंदाकिनी  दीर्घिकायाम मृगभूजायाम स्थिता
सूर्यमालायाम वसुंधरा ग्रहे...  भरतवर्षे  जम्बुद्वीपे ....." असा संकल्प सोडल्यास परमेश्वराला आपलं नेमका स्थान कळेल आणि आपल्याला विश्वाचे अमर्यादत्व !!

Apr 17, 2017

ओळख तारकासमूहांची -१

तारकासमूह ((Constellation: )याचा अर्थ होईल जवळजवळ वाटणाऱ्या  तार्यांची विशिष्ट मांडणी .
आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह म्हणजे फक्त तार्यांची विशिष्ट मांडणी नाही तर  ते इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.

ताऱ्यांचे निरीक्षण करताना आपल्या पूर्वजांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ताऱ्यांचे परस्पर सापेक्ष स्थान बदलत नाही.त्यामुळे त्यांची एक विशिष्ट रचना आकाशात कायम राहते उदाहरणार्थ उत्तर दिशेला दिसणाऱ्या ह्या  ७ तार्यांची पतंग किंवा खाटीकाच्या सुऱ्या सारखी वाटणारी रचना कायम राहते . हे ७ तारे याच रचनेत उगवतात आणि मावळतात .
रात्रीच्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात एकूण एक तार्यालाओळखणे ,नाव देणे हे अगदीच अशक्य कोटीतले काम . त्या पेक्षा  या ताऱ्यांच्या समूहाला ओळखणे सोपे वाटू लागले .अमूर्तातून ओळखीचे आकार शोधणं हा तर मानवी मनाचा आवडता छंद .म्हणून आपण लहानपणी ढगांच्या वेड्यावाकड्या आकारात कधी  ससा ,हत्ती पासून तर अगदी डायनोसॉर पर्यंतची कल्पना करण्याचा खेळ खेळायचो .आपल्या आदिम पूर्वजांनी पण अगदी हेच केलं. या ताऱ्यांच्या विशिष्ठ समूहामध्ये  वेगवेगळे प्राणी,पक्षी,झाडे यांचे आकार पाहायला सुरवात केली.कोणाला त्यात सिंह दिसला , कोणाला मोर ,कोणाला साप तर कोणाला  गरुड . जंगली,पाळीव ,जलचर ,सरीसृप , पक्षी हे कमी होते कि काय म्हणून  ड्रॅगन , पंख असलेला घोडा ,युनिकोर्न या सारखे काल्पनिक प्राण्यांची सुद्धा त्यात भर पडली .जश्या जश्या संस्कृती प्रगत होत गेल्या तसे तसे या रचनेत  मानवी,दैवी आकार दिसायला सुरुवात झाली . हे या ताऱ्यांचे समूह म्हणजे तारकासमूह .
माणूस हा मुळातच गोष्टीवेल्हाळ प्राणी . त्यामुळे या तारकासमूहांविषयी माणसाने दंतकथा रचल्या नसत्या तर नवल होत .व्यापारी ,हौशी प्रवासी ,यांच्या माध्यमातून या कथा ,तारकासमूहांची नावे  देशोदेशी पसरल्या. 
एकाच तारकासमूहाच्या आकृतीत  वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कल्पना लढवल्या .उलटं  प्रश्नचिन्ह आणि त्याच्या मागे एक त्रिकोण या ताऱ्यांच्या आकृतीत ग्रीक लोकांना बसलेला सिंह दिसला तर चिनी लोकांना  उडणारा पिवळा ड्रॅगन. भारतीय लोकांनी विळ्यासारखा आकार म्हणजे पालखी मानली (मघा  नक्षत्र ) तर उरलेला भाग म्हणजे पलंग मानला (पूर्वा -उत्तर फाल्गुनी)."पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" दुसर काय?
यात पण कधी कधी काही तरी समानता आढळते..मिथुन तारकासमूहाच्या आकृतीत ग्रीक लोकांना जुळे भाऊ दिसले तर अरबांना जुळे मोर .भारतीयांना त्यांना जुळे राक्षस मानले (पुनर्वसू) तर आदिवासी लोकांना ते जुळे झाडे वाटली .सगळ्यांनी  त्याला जुळेच मानले हे विशेष !!
अशा प्रकारची काल्पनिक विभागणी करायला अगदी अश्मयुगापासूनच सुरवात झाली होती.
फ्रांस जवळील लास्को इथल्या गुफाचित्रांत याचा पुरावा सापडतो .इजिप्त ,ग्रीस ,रोमन इथल्या अनेक प्राचीन शिल्पाकृतीत हे तारकासमूह दिसतात .प्राचीन इराक जवळच्या युफ्राटेस  प्रांतात मिळालेल्या अवशेषांवरून कळते कि त्या काळी (इसपु ४०००) लोकांनी सिंह,वृषभ,वृश्चिक हे तारकासमूह मानले होते .प्राचीन भारतीयांनी फक्त आयनिक वृत्तावरील नक्षत्रांना महत्व देत इतर तारकासमूहांकडे थोडे  दुर्लक्ष केल..ऋग्वेदात २७ नक्षत्रांसोबतच  मृगाजवळचा  कुत्रा (कॅनिस मेजर ), ऋक्ष (उर्सा मेजर) यांचे उल्लेख येतात.ग्रीक कवी अरेटस (इसपु २७५) याच्या "द फेनामेना"या काव्यात काही तारका समूहांचा उलेख आढळतो. हिप्पार्कस(इसपु १५०) या ग्रीक खगोल शास्त्रज्ञाने आकाशाचे नकाशे तयार केले.

आपल्याला आज माहित असलेल्या आधुनिक तारकासमूहांची कल्पना इ स दुसऱ्या शतकापासून पुढे आली. ग्रीक तत्वज्ञ टॉलेमी ने आला ४८ तारकासमूहांची यादी बनवली .यात प्रामुख्याने उत्तर गोलार्धातून दिसणारे तारकासमूहच होते .टॉलेमीचे हे ४८ तारकासमूह पुढे अनेक शतके सर्वमान्य ठरले . पुढे  १६ व्या शतकांत युरोपातील साहसी दर्यावर्दी दक्षिण गोलाधार्थ प्रवास करू लागले . तिथे त्यांना अनेक नवे तारकासमूह दिसले जे उत्तरी गोलार्धातून दिसत नव्हते .  सतराव्या शतकाच्या आरंभी जोहान बायर याने दक्षिणी गोलार्धातील दिसणाऱ्या १२ नव्या तारकासमूहांची भर टाकून आकाशाचा नकाशा तयार केला .आता तारकासमूहांची संख्या झाली ६०.

जोहानचा सहकारी जॅकोब  बर्श्च  याने नरतुरंग या मोठ्या तारकासमुहातून काही तारे वेगळे करून त्रिशंकू हा नवा तारकासमुह बनवला . असेच नवे ३ तारकासमुह त्याने या यादीत जोडले . याच काळात टायको ब्राहेने सिंह आणि कन्या तारकासमुहाजवळील काही ताऱ्यांचा अरुंधती केश तारकासमुह बनवला .  या यादीत १६८७ मध्ये जोहानस  हॅवेलीअस या जर्मन खगोलतज्ज्ञाने ७ तारकासमुहाची भर टाकली . पुढे निकोलस लुईस दि लाकाईल  याने दक्षिणी गोलार्धातील १४ नवे तारकासमूह बनविले .

जुन्या तारकासमुहातुन काही तारे  वेगळे करून नवे तारकासमुह बनवण्याची चढाओढ वाढू लागली .यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली . हा सावळा गोंधळ टाळण्यासाठी  १९३० मध्ये   इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.) या आंतरराष्ट्रीय संस्थेने आकाशाची विभागणी करून ८८ तारकासमूह सुनिश्चित केले . या तारकासमूहांच्या सीमारेषा निश्चित केल्या आणि त्या क्षेत्राच्या आत येणारे सगळे अवकाशीय घटक (तारे , तारकापुंज  इत्यादी ) हे त्या तारकासमूहाचे घटक असतील असे ठरविण्यात आले . हेच आजचे  परिचित ८८ तारकासमूह!



यातील बहुतांश तारकासमूहाना मराठी नावे  नव्हती .दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पाश्च्यात्य नावांचे भारतीयकरण केले .त्यांनी नावांचे फक्त शब्दश: भाषांतर केले नाही तर ज्या प्रमाणे पाश्चात्यांनी ग्रीक पुराणांतील वेगवेगळ्या कथांचा वापर केला तश्याच प्रकारे जांभेकरांनी भारतीय पुराण कथांचा खुबीने वापर केला. उदाहरणार्थ उत्तर आकाशातील शर्मिष्ठा (Cassiopeia) ,देवयानी (Andromeda),ययाती (Perseus) आणि वृषपर्वा (Cephus) हे तारकासमूह महाभारतातील एका कथेत गुंफल्याचे आपल्याला आढळते.


८८ तारकासमुहांची यादी पुढील प्रमाणे :

क्र.तारकासमूह Name
१. देवयानी  Andromeda
२. वाताकर्ष  Antlia
३. कपोत  Apus
४. कुंभ  Aquarius
५. गरूड  Aquila
६. पीठ  Ara
७. मेष  Aries
८. सारथी  Auriga
९. भूतप  Bootes
१०. सीलम  Caelum
११. करभ  Camelopardalis
१२. कर्क  Cancer
१३. शामशबल  Canes Venatici
१४. बृहदलुब्धक  Canis Major
१५. लघुलुब्धक Canis Minor
१६. मकर  Capricornus
१७. नौकातल  Carina
१८. शर्मिष्ठा  Cassiopeia
१९. नरतुरंग  Centaurus
२०. वृषपर्वा  Cepheus
२१. तिमिंगल  Cetus
२२. वायुभक्ष  Chamaeleon
२३. कर्कटक  Circinus
२४. पारावत  Columba
२५. अरुंधती केश  Coma Berenices
२६. दक्षिण मुकुट  Corona Australis
२७. उत्तर मुकुट Corona Borealis
२८. हस्त Corvus
२९. चषक Crater
३०. त्रिशंकू Crux
३१. हंस Cygnus
३२. धनिष्ठा  Delphinus
३३. असिदंष्ट  Dorado
३४. कालेय  Draco
३५. अश्वमुख  Equuleus
३६. यमुना  Eridanus
३७. अश्मंत  Fornax
३८. मिथुन  Gemini
३९. बक  Grus
४०. शौरी  Hercules
४१. कालयंत्र  Horologium
४२. वासुकी  Hydra
४३. अलगद  Hydrus
४४. यम  Indus
४५. सरठ  Lacerta
४६. सिंह  Leo
४७. लघु सिंह  Leo Minor
४८. शशक  Lepus
४९. तूळ  Libra
५०. वृक  Lupus
५१. गवय  Lynx
५२. स्वरमंडळ  Lyra
५३. त्रिकूट  Mensa
५४. सुक्ष्मदर्शी  Microscopium
५५. शृंगाश्व  Monoceros
५६. मक्षिका  Musca
५७. अंकनी  Norma
५८. अष्टक  Octans
५९. भुजंगधारी  Ophiuchus
६०. मृग  Orion
६१. मयूर  Pavo
६२. महाश्व  Pegasus
६३. ययाती  Perseus
६४. जटायू  Phoenix
६५. चित्रफलक  Pictor
६६. मीन  Pisces
६७. दक्षिण मस्त्य  Piscis Austrinus
६८. अरीत्र  Puppis
६९. होकायंत्र  Pyxis
७०. जालक  Reticulum
७१. शर  Sagitta
७२. धनू  Sagittarius
७३. वृश्चिक  Scorpius
७४. शिल्पकार  Sculptor
७५. ढाल  Scutum
७६. भुजंग  Serpens
७७. षडंश  Sextans
७८. वृषभ  Taurus
७९. दुर्बीण  Telescopium
८०. उत्तर त्रिकोण  Triangulum
८१. दक्षिण त्रिकोण  Triangulum Australe
८२. कारण्डव  Tucana
८३. सप्तर्षी  Ursa Major
८४. ध्रुवमस्त्य  Ursa Minor
८५. नौशीर्ष  Vela
८६. कन्या  Virgo
८७. शफरी  Volans
८८. जंबुक  Vulpecula

संदर्भ :
तारांगण -प्रदीप नायक
मराठी विश्वकोश
आकाशाशी जडले  नाते -जयंत नारळीकर
अवकाशवेध
खगोलमंडळ


Apr 13, 2017

गाथा खगोलशास्त्राची -१


खगोलशास्त्र .. आपल्या सभोवताल असणाऱ्या अथांग अमर्याद अवकाशाचा ,त्यातील तारे ,ग्रह,तेजोमेघ,कृष्णविवर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र.सभोवतालच्या घटनांचे  निरीक्षण करून काही निष्कर्ष काढणे हि माणसाची  प्रवृत्ती आहे . सूर्य,चंद्र,तारे ,ग्रह,धूमकेतू,उल्का ,तारकासमूह यांनी मानव भारावून गेला नसता  तर आश्चर्य होते . नैसर्गिक घटनांचे  कुतूहल आणि त्या मागील कार्य-कारण भाव समजून घेण्याची उर्मी यातून खगोलशास्त्रासह विज्ञानाच्या इतर शाखांचा उदय झाला .

खगोलशास्त्राचे आज असणारे ज्ञान काही एका रात्रीत मिळाले नाही ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचे फळ आहे .
खगोलशास्त्राची  उत्क्रांती चार टप्यात मांडता येईल. पहिले पर्व  म्हणजे थेट आदिकालापासून तर  गॅलिलिओच्या काळा पर्यंतचा प्रदीर्घ  कालखंड .या काळात फक्त  डोळय़ांनीच अवकाश निरीक्षण करून अनुमान लावले गेले . सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओच्या रूपाने मानवाने  आकाशाकडे दुर्बीण रोखली  आणि खगोलशास्त्राला नवी दृष्टी मिळाली  हि   दुसऱ्या पर्वाची नांदी . दुर्बिणीतून निरीक्षण करून अनेक नव्या गोष्टी समोर आल्या . दुर्बिणीतून दिसणारे विश्व  खरेसे असले तरी पुरेसे नव्हते अठराव्या शतकात वर्णपटलीय  विश्लेषणातून नव्या गोष्टी उजेडात आल्या , हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून  चौथ्या पर्वात खगोलशास्त्राचा प्रचंड वेगाने विकास झाला   वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच काळातला .  १९६७ मध्ये चंद्रावर  पाऊल  ठेऊन मानवाने सीमोल्लंघन केले. आणि आज तर या प्रगतीचा वारू चौफेर उधळला आहे


खगोलशास्त्र हि विज्ञानाची सर्वात जुनी शाखा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कारण अगदी आदिम अवस्थेत असल्या पासून माणूस आकाशाचे निरीक्षण करतो आहे. साधारण दीड लाख वर्षांपूर्वी दगडवर दगड घासून अग्नी चा शोध माणसाने लावून एका वैज्ञानिक युगाची सुरवात केली अस आपण  मानतो .परंतु याच्या आधी पासून माणसाला आकाशाचे कुतूहल असले पाहिजे किंबहुना आकाश निरीक्षण हि त्याची गरज असावी . कारण आकाशात एक मोठा तेजा चा गोळा असतो तो असे पर्यंत  शिकार वैगरे करून घ्या एकदा का तो गोळा नाहीसा झाला कि अंधारात हिंस्र  पशूंची भीती . त्यामुळे मानसणारे सूर्याच्या उदय अस्ता प्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार बसवले असतील .
 
पुढे अग्नीचा शोध लागून काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने रात्रीच्या आकाशाकडे नजर टाकली असेल .चांदण्यांनी गच्चं  भरलेलं आकाश पाहून आपले आदिम पूर्वज भारावून जात असतील . या ताऱ्यांचे त्यांना आकर्षण ,गूढ कधी कधी भीती सुद्धा वाटत असेल . अमूर्तामध्ये ओळखीचे आकार शोधणे हा मनुष्याचा स्वभाव आहे .यातून ताऱ्यांच्या विशिष्ट मांडणी मध्ये त्यांना सभोवतालचे प्राणी ,पक्षी ,झाडे दिसले असतील . पुढे पुढे या प्राण्याच्या ,पक्ष्यांच्या नावावरूनच त्यांनी आकाशातील ताऱ्यांच्या मांडणीला नाव द्यायला सुरवात केली असेल . हीच खगोलशास्त्राची प्राथमिक अवस्था .

अभिव्यक्त होणं हा माणसाचा फक्त स्वभाव नाही तर गरजही असल्याने माणसाने या त्याच्या खगोलीय कल्पनांची चित्रे काढली. फ्रांस जवळील लास्को( Lascaux) येथे एका गुहेत  उत्तर पुराष्मयुगीन  भित्तिचित्रे आढळलीआहेत . या चित्रात आदिमानवाने  मृग तारकासमूह ,वृषभ तारका समूह ,त्याचा बैलाचा काल्पनिक आकार , जवळ कृत्तिकेच्या ७ चांदण्या  अगदी ठळकपणे दाखवले आहे .हि चित्रे इ.स.पु १७,३०० इतकी जुनी आहेत 
पुढे नवाश्मयुगात माणसाने शेती करायला सुरवात केली . शेतीसाठी पावसाचा अंदाज  ,ऋतूंचे चक्र हे समजून घेणे गरजेचे ठरले. या गरजेतून म्हणा किंवा उपजत असलेल्या  बुद्धिमत्तेतून म्हणा माणसाने निरीक्षणातून काही निष्कर्ष काढायला सुरवात केली . अमुक एका तारका समूहात सूर्य किवा चंद्र असताना अमुक ऋतू असतो किंवा पावसाची सुरवात या सारखी एखादी घटना घडते . हे माणसाच्या लक्षात आले .काही घटनांची  विशिष्ट कालावधी नंतर पुनरावृत्ती होते हे देखील मानवाच्या लक्षात आले. निरिक्षणीय खगोलशास्त्राची हि सुरवात होती . माणसाने आता अधिक जोमाने निरीक्षणे करून ठोकताळे बांधायला सुरवात केली . खगोलशास्त्राचे बाळ आता मान धरू लागले होते .

पुढे ताम्रपाषाण युगात ,लोहयुगात सुद्धा खगोल शास्त्राचा विकास संथ  गतीने होत राहिला.जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या संस्कृतींचा उदय झाला .आता फक्त पिकपाण्या साठी नाही तर धार्मिक,सांस्कृतिक कारणांसाठी खगोलीय ज्ञानाची गरज वाटू लागली . विशिष्ट खगोलीय घटनांच्या वेळी विशिष्ट सणवार,उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . सणवार,शेतसारा, पिकचक्र यासाठी कालगणनेची  गरज होती रोजचे दिवस-रात्र ,चंद्राच्या कला , सूर्याचे उत्तर-दक्षिणे कडे होणार प्रवास , विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा येणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून माणसाने  दिवस ,महिना ,वर्ष  हि कालमापनाची एकके निर्माण केली . आणि  इथे खगोलशास्त्राचे बाळ अधिक जोमाने रांगू लागले .


Apr 4, 2017

आकाशाशी जडले नाते ....

रात्रीच्या आकाशात अगदी सहज जरी पाहिलं तरी दिसतात असंख्य तारे ! यांच्याच जोडीला आपल्या दिसतात भटके ग्रह, कापूस पिंजून ठेवल्या सारखे तेजोमेघ, द्राक्षाच्या  झुबक्या प्रमाणे काही तारकापुंज .
मधेच एखादी चुकार उल्का चमकून जाते तर कधी धूमकेतू सारखे पाहुणे आपल्या भेटीला येतात .
चांदोबाला मामा म्हणणाऱ्या लहान मुलांपासून तर सहस्रचंद्रदर्शन  करणाऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांनाच या आकाशाच कुतूहल असते.

आज सिमेंटच्या जंगलात खिडकीतून आकाशाचा अगदी छोटासा  तुकडा आपल्या वाट्याला येतो .त्यात प्रकाशाचे बेसुमार प्रदूषण . या झगमगाटात चंद्राची कोर सुद्धा मोठ्या मुश्कीलने दिसते तर तारकासमूहांचे आकार , आपल्या आकाशगंगेचा पट्टा ,वसिष्ठ-अरुंधती सारखे जोडतारे ,मृगाचा तेजोमेघ ,कृत्तिके सारखे तारकापुंज हे सगळं दिसणं तर दुर्लभच झालंय.

 तरी सुद्धा आपल्या  सगळ्यांच्या  मनात एक आकाश असतं ! लहानपणी  मामाच्या गावी अंगणात झोप     लागेपर्यंत  डोळ्यात साठवलेलं आकाश आजही मनात घर करून असतं .आजी आजोबानी सांगितलेली ध्रुवबाळाची, नक्षत्रांच्या गोष्टी ,मामाने दाखवलेला ध्रुवतारा , त्याच्या भोवती  प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षी ,अंधुकशी अरुंधती ,डमरू सारखं मृग,त्यात हरीण बसवण्यासाठी कल्पनाशक्तीला दिलेला ताण .जुन्या लोकांनी सांगितलेल्या धूमकेतूच्या आठवणी ......हे सगळं आजही आठवणींच्या कुठल्याश्या कोपऱ्यात दडून बसले असते.

खरतर आपली संस्कृती सुद्धा या खगोलशास्त्राचा हात धरून जाते .बाळाचा  जन्म झाल्यावर त्याच नाव त्याच्या जन्मनक्षत्रावरून  ठेवतो . वास्तुशांतीच्या पूजेत ध्रुवताऱ्याची त्याच्या अढळपणामुळे प्रतीकात्मक पूजा केली जाते . लग्न झाल्या वर वधूवरांना सप्तर्षी  आणि ध्रुवतार्याचे  दर्शन घ्यायला लावतात .नवऱ्याने वसिष्ठ  दाखवायचा  आणि बायकोने त्याच्या शेजारची अंधुकशी  अरुंधती ओळखून दाखवायची.सगळे सणवार हे चंद्राच्या कलेवर आधारित. मकरसंक्रांती सारखा एखादा सण सूर्याचे राशीभ्रमण दाखवून देतो .त्यावरून आपल्याला कळते कि सूर्य दर महिन्याच्या  १४ तारखेला राशी बदलतो .तुम्ही  जर चतुर्थी करत असला तर  कळेल  कि कृष्ण पक्षात चंद्र रात्री उगवतो  तर शुक्ल पक्षात दिवसा .त्यात पण मे  महिन्यातल्या चतुर्थीला चंद्रोदय सगळ्यात उशिरा .पोटात भुकेने  ओरडणाऱ्या कावळ्यांमुळे हि गोष्ट आजही लक्षात आहे .रोजच्या पूजेत संकल्प सोडताना पंचांगाचा उल्लेख करावा लागतो . त्यातूनच रोजची तिथी,चंद्र,सूर्य ,गुरु हे कुठल्या राशीत आहे ?चंद्राची कुठली कला चालू आहे? हे रोजच्यारोज कळतं.कोजागिरी पौर्णिमे सारखा सण  टिपूर चांदण्यात फक्त जागायला नाही तर जगायला शिकवतो .

आणि म्हणूनच शहराच्या झगमगाटात आपण आकाशदर्शन विसरतोय कि काय असं वाटत असताना सुद्धा कधी  ट्रेकिंगच्या निमित्ताने ,तर कधी शहर पासून दूर प्रवास करताना अवचित निरभ्र नितळ आकाश दिसलं कि आपण थोड थांबतो.. तारकासमूहांचे आकार ओळखीचे वाटू लागतात.आठवणींचे पेटारे पुन्हा उघडली जातात . गोष्टी सांगणाऱ्या आज्जीचा आवाज कानात घुमायला लागतो.
"तो मृग कारे ?? .......हा सिंह असावा ... माझ्या मते हा तारा लुकलुकत नाहीये म्हणजे तो ग्रह असावा..
 गुरु का तो? ..... हे इथे  सप्तर्षी  म्हणजे ध्रुव तारा हा असा इथे असणार ....
माझ्या मामानी लहानपणी  शिकवलं  होत मला .... तुला ध्रुवबाळाची गोष्ट  माहितीये  का ? माझी आजी सांगायची मला ..माझी फेव्हरेट गोष्ट होती ती !!!!!"
हे असले संवाद सुरु होतात. लहानपणी डोळ्यात साठवलेलं आकाश पुन्हा मनाला व्यापून टाकतं ..
आणि आकाशाशी पुन्हा  नाते  जडते ...

माझ्याही मनात असच आकाश दडले होते ..खगोलमंडळात यायला लागल्या पासून  हे आकाश विस्तारायला लागले .तारे ,त्यांचा शास्त्रीय अभ्यास ,त्यांचे प्रकार  यांचा अभ्यास  सुरु झाला .वेगवेगळे तारका समूह ओळखता येऊ लागले  लहानपणापासूनच  गोष्टीवेल्हाळ असल्यानाने या प्रत्येक तारकासमूहाच्या वेगवगळ्या संस्कृतीत असणाऱ्या गोष्टी ,दंतकथा  यात रमायला लागलो . त्याच सोबत त्यांची शास्त्रीय माहिती , अवकाशस्थ  वस्तू  यांचा अभ्यास सुरु झाला . रात्रभर जागून केलेली निरीक्षणे ,सध्या डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तू दुर्बिणीतून पाहताना येणार आनंद . एक तास झुंझ देऊन दुर्बिणीतून स्वतः शोधात लावलेला एखादा ऑब्जेक्ट .यातून आकाश अधिकच समजत गेले .

 या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक घास काढून  हा ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न ..
हे वाचताना तुमच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेलं आकाश सुद्धा पुन्हा मुक्त व्हावं आणि आकाशही पुन्हा नातं जडावं  हीच सदिच्छा !!!!!