Apr 27, 2017

आपला "वैश्विक पत्ता"

आपला  वैश्विक पत्ता
"तुम्ही कुठे राहतात ?"असं कोणी आपल्याला विचारल तर हा प्रश्न कुठे विचारला गेला आहे  त्याप्रमाणे आपण आपला पत्ता सांगतो.उदाहरणार्थ आपल्याच बिल्डिंग मध्ये येऊन एखाद्याने विचारल तर आपण  फक्त फ्लॅट नं सांगू.आपल्या  एरियात कोणी  विचारलं तर बिल्डिंगच नाव सांगू .दुसऱ्या भागात असू तर आपल्या एरियाच नाव सांगू .दुसऱ्या शहरात असू तर आपल्या शहराचं नाव सांगू .आणि कोणी विदेशात हा प्रश्न विचारला तर भारतात राहतो असं सांगू ?
थोडक्यात काय तर हा प्रश्न विचारणाऱ्याच आपल्या सापेक्ष भौगोलिक स्थान काय यावरून आपण आपल्या पत्त्याची व्याप्ती वाढवतो.आपल्या बिल्डिंगमध्ये आलेल्या पोस्टमन ला फक्त फ्लॅट नं सांगणं पुरेसं आहे तर अमेरिकेतल्या ऑनलाईन मित्राला भारत-महाराष्ट्र-नाशिक अस सांगाव लागेल.

पण समजा एखाद्या परग्रहवासियाने आपल्याला हाच प्रश्न विचारला तर ??? सोप्पंय कि त्याला सांगायचं पृथ्वी !  म्हणजे आपला वैश्विक पत्ता झाला पृथ्वी!

पण जर तो आपल्या सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावरचा असला  तरच त्याला पृथ्वी माहित असेल.
आपली पृथ्वी हि सूर्यमालेच्या घटक आहे .सूर्य या ताऱ्या भोवती फिरणारे खगोलीय घटक म्हणजे सूर्यमाला. यात ८ प्रमुख ग्रह ,त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ नैसर्गिक उपग्रह, प्लूटो सारखे ५ बटु ग्रह , अनेक उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
म्हणजे आता आपला पत्ता झाला सूर्यमाला-पृथ्वी!


पण आपली सूर्यमाला "मंदाकिनी "/आकाशगंगा (Milky Way Galaxy) या दीर्घिकेत आहे .आपल्या या दीर्घिकेत असे  साधारण २०० अब्ज तारे आहेत .या ताऱ्यांच्या आपल्या आपल्या ग्रहमाला असतील .या व्यतिरिक्त आकाशगंगेत अनेक तेजोमेघ ,तारकागुच्छ ,आंतरतारकीय द्रव्य, उष्ण वायू, धूलिकण आहेत.आपली आकाशगंगा  सर्पिलाकार आहे. म्हणजे तिच्या केंद्रापासून अनेक भुजा निघतात(दिवाळीतल्या भुईचक्र सारखं) यातल्या मृग नावाच्या उप-भुजेत आपली सूर्यमाला आहे. याचे स्थान धनु भुजा आणि ययाती भुजेच्या मध्ये आहे .आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून साधारण २६००० प्रकाशवर्ष दूर आहे .
म्हणजे आता आपला  पत्ता झाला  मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी.



अवकाशात दीर्घिका या एकट्याने न आढळता समूहाने असतात. आपली दीर्घिका "आकाशगंगा" सुद्धा  एका दीर्घिका समूहाचा भाग आहे . याला स्थानिक दीर्घिका समूह (Local Group) म्हणतात .या समूहात ५४ दीर्घिका असून बहुतेक लघुदीर्घिका आहेत. आपली आकाशगंगा ,देवयानी आणि  ट्राऐन्गुलम या आकाराने मोठ्या असणाऱ्या सर्पिलाकार दीर्घिका आहेत. देवयानी हि आकाराने सगळ्यात मोठी आहे. या समूहाचा व्यास साधारण १ करोड  प्रकाशवर्ष इतका आहे .
म्हणजे आता आपला पत्ता झाला स्थानिक समूह-मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी  !


 पण हा स्थानिक समूह एका मोठ्या दीर्घिकीय समूहाचा भाग आहे. ज्याला  कन्या महासमूह(Virgo Supercluster) या नावाने ओळखले जाते .यात १०० हुन अधिक दीर्घिकीय समूह आहेत . आपल्याला पृथ्वीवरून कन्या तारकासमूहात दिसणारा दीर्घिकांचा समूह "कन्या दीर्घिकीय समूह "(Virgo cluster)या मोठ्या महासमूहाच्या केंद्रभागी आहे .म्हणजे आता आपला पत्ता झाला-कन्या महासमूह -स्थानिक दीर्घिकीय समूह-मंदाकिनी दीर्घिका -सूर्यमाला-पृथ्वी  

विश्वाची व्याप्ती अनंत आहे .जशी जशी आपली वैज्ञानिक प्रगती होते तशी तशी आपल्याला विश्वाचा हा अनंत पसारा समजत जातो .२०१४ मध्ये आपल्याला समजले कि कन्या महासमूह हा एका बृहत महासमूहाचा भाग आहे .याला लानीआकिया महासमूह (Laniakea Supercluster) या नावाने ओळखले जाते .लानीआकिया  या हवाई भाषेतील शब्दाचा अर्थ होतो अपरिमित ब्रह्माण्ड . या बृहत महासमूहात आपल्या कन्या महासमुहासारखे वासुकी महासमूह(Hydra Supercluster),नरतुरंग महासमूह असे अनेक दीर्घिकीय महासमूह आहेत .
म्हणजे आता आपला पत्ता झाला
लानीआकिया बृहत महासमूह -कन्या महासमूह -स्थानिक दीर्घिकीय समूह-मंदाकिनी दीर्घिका- सूर्यमाला-पृथ्वी



पण विश्वाची व्याप्ती या पेक्षाही खूप प्रचंड मोठी आहे .लानीआकिया सारखे शौरी महासमूह(Hercules Supercluster) ,महाश्व-मिन महासमूह(Perseus-Pisces Supercluster) ,कोमा महासमूह (Coma Supercluster) असे अनेक महासमूह आहेत. जसे जसे आपल्याला आपले विश्व उमजत जाईल तस तस  आपल्या वैश्विक पत्त्यात नवीन स्थानांची भर पडेल. अर्थातच हा "वैश्विक पत्ता " इतर कुठल्या दीर्घिकीय समूहात राहणाऱ्या एलियन ला सांगून पण कळणार नाही कारण हि सगळी आपण दिलेली नाव आहेत . पण या अभ्यासातून आपल्याला विश्व  किती अमर्याद आहे आणि त्या पुढे आपण किती नगण्य हे समजत जाते . या व्यापकते पुढे आपल्या पृथ्वीवरचे प्रांतवाद ,राष्ट्रवाद ,इतकाच काय तर 'मानवता ' वैगरे शब्द पण खुजे वाटतात !


अवांतर : आपल्या संस्कृतीत पूजा करताना संकल्प सोडला जातो. त्यात अखिल ब्रह्माण्डाच्या अधिपती परमेश्वराला आपण त्याच्या अमर्याद ब्रह्माण्डातून नेमके  कुठून पूजा करतो आहोत हे कळावे म्हणून "देशकालसंकीर्तन " म्हणे आपल्या स्थानाचा उल्लेख करून संकेला जातो..भरतवर्षे  जम्बुद्वीपे   दंडकारण्ये गोदावर्या दक्षिणतीरे नाशिक क्षेत्रे .... वैगरे .  
आपल्या पूर्वजांना विश्वाविषयी मर्यादित ज्ञान असल्याने त्यांनी पृथ्वी हा मोठा घटक मानला .आता आपल्याला ज्ञात व्याप्ती प्रमाणे संकल्प बदलायला हरकत नसावी !
"कन्या महासमुहे स्थानीय दीर्घिकासमुहे मंदाकिनी  दीर्घिकायाम मृगभूजायाम स्थिता
सूर्यमालायाम वसुंधरा ग्रहे...  भरतवर्षे  जम्बुद्वीपे ....." असा संकल्प सोडल्यास परमेश्वराला आपलं नेमका स्थान कळेल आणि आपल्याला विश्वाचे अमर्यादत्व !!

No comments:

Post a Comment