Apr 13, 2017

गाथा खगोलशास्त्राची -१


खगोलशास्त्र .. आपल्या सभोवताल असणाऱ्या अथांग अमर्याद अवकाशाचा ,त्यातील तारे ,ग्रह,तेजोमेघ,कृष्णविवर यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र.सभोवतालच्या घटनांचे  निरीक्षण करून काही निष्कर्ष काढणे हि माणसाची  प्रवृत्ती आहे . सूर्य,चंद्र,तारे ,ग्रह,धूमकेतू,उल्का ,तारकासमूह यांनी मानव भारावून गेला नसता  तर आश्चर्य होते . नैसर्गिक घटनांचे  कुतूहल आणि त्या मागील कार्य-कारण भाव समजून घेण्याची उर्मी यातून खगोलशास्त्रासह विज्ञानाच्या इतर शाखांचा उदय झाला .

खगोलशास्त्राचे आज असणारे ज्ञान काही एका रात्रीत मिळाले नाही ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचे फळ आहे .
खगोलशास्त्राची  उत्क्रांती चार टप्यात मांडता येईल. पहिले पर्व  म्हणजे थेट आदिकालापासून तर  गॅलिलिओच्या काळा पर्यंतचा प्रदीर्घ  कालखंड .या काळात फक्त  डोळय़ांनीच अवकाश निरीक्षण करून अनुमान लावले गेले . सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओच्या रूपाने मानवाने  आकाशाकडे दुर्बीण रोखली  आणि खगोलशास्त्राला नवी दृष्टी मिळाली  हि   दुसऱ्या पर्वाची नांदी . दुर्बिणीतून निरीक्षण करून अनेक नव्या गोष्टी समोर आल्या . दुर्बिणीतून दिसणारे विश्व  खरेसे असले तरी पुरेसे नव्हते अठराव्या शतकात वर्णपटलीय  विश्लेषणातून नव्या गोष्टी उजेडात आल्या , हे तिसरे पर्व. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यापासून  चौथ्या पर्वात खगोलशास्त्राचा प्रचंड वेगाने विकास झाला   वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींचा उदय याच काळातला .  १९६७ मध्ये चंद्रावर  पाऊल  ठेऊन मानवाने सीमोल्लंघन केले. आणि आज तर या प्रगतीचा वारू चौफेर उधळला आहे


खगोलशास्त्र हि विज्ञानाची सर्वात जुनी शाखा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कारण अगदी आदिम अवस्थेत असल्या पासून माणूस आकाशाचे निरीक्षण करतो आहे. साधारण दीड लाख वर्षांपूर्वी दगडवर दगड घासून अग्नी चा शोध माणसाने लावून एका वैज्ञानिक युगाची सुरवात केली अस आपण  मानतो .परंतु याच्या आधी पासून माणसाला आकाशाचे कुतूहल असले पाहिजे किंबहुना आकाश निरीक्षण हि त्याची गरज असावी . कारण आकाशात एक मोठा तेजा चा गोळा असतो तो असे पर्यंत  शिकार वैगरे करून घ्या एकदा का तो गोळा नाहीसा झाला कि अंधारात हिंस्र  पशूंची भीती . त्यामुळे मानसणारे सूर्याच्या उदय अस्ता प्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार बसवले असतील .
 
पुढे अग्नीचा शोध लागून काही अंशी स्थिरस्थावर झाल्यानंतर माणसाने रात्रीच्या आकाशाकडे नजर टाकली असेल .चांदण्यांनी गच्चं  भरलेलं आकाश पाहून आपले आदिम पूर्वज भारावून जात असतील . या ताऱ्यांचे त्यांना आकर्षण ,गूढ कधी कधी भीती सुद्धा वाटत असेल . अमूर्तामध्ये ओळखीचे आकार शोधणे हा मनुष्याचा स्वभाव आहे .यातून ताऱ्यांच्या विशिष्ट मांडणी मध्ये त्यांना सभोवतालचे प्राणी ,पक्षी ,झाडे दिसले असतील . पुढे पुढे या प्राण्याच्या ,पक्ष्यांच्या नावावरूनच त्यांनी आकाशातील ताऱ्यांच्या मांडणीला नाव द्यायला सुरवात केली असेल . हीच खगोलशास्त्राची प्राथमिक अवस्था .

अभिव्यक्त होणं हा माणसाचा फक्त स्वभाव नाही तर गरजही असल्याने माणसाने या त्याच्या खगोलीय कल्पनांची चित्रे काढली. फ्रांस जवळील लास्को( Lascaux) येथे एका गुहेत  उत्तर पुराष्मयुगीन  भित्तिचित्रे आढळलीआहेत . या चित्रात आदिमानवाने  मृग तारकासमूह ,वृषभ तारका समूह ,त्याचा बैलाचा काल्पनिक आकार , जवळ कृत्तिकेच्या ७ चांदण्या  अगदी ठळकपणे दाखवले आहे .हि चित्रे इ.स.पु १७,३०० इतकी जुनी आहेत 
पुढे नवाश्मयुगात माणसाने शेती करायला सुरवात केली . शेतीसाठी पावसाचा अंदाज  ,ऋतूंचे चक्र हे समजून घेणे गरजेचे ठरले. या गरजेतून म्हणा किंवा उपजत असलेल्या  बुद्धिमत्तेतून म्हणा माणसाने निरीक्षणातून काही निष्कर्ष काढायला सुरवात केली . अमुक एका तारका समूहात सूर्य किवा चंद्र असताना अमुक ऋतू असतो किंवा पावसाची सुरवात या सारखी एखादी घटना घडते . हे माणसाच्या लक्षात आले .काही घटनांची  विशिष्ट कालावधी नंतर पुनरावृत्ती होते हे देखील मानवाच्या लक्षात आले. निरिक्षणीय खगोलशास्त्राची हि सुरवात होती . माणसाने आता अधिक जोमाने निरीक्षणे करून ठोकताळे बांधायला सुरवात केली . खगोलशास्त्राचे बाळ आता मान धरू लागले होते .

पुढे ताम्रपाषाण युगात ,लोहयुगात सुद्धा खगोल शास्त्राचा विकास संथ  गतीने होत राहिला.जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या संस्कृतींचा उदय झाला .आता फक्त पिकपाण्या साठी नाही तर धार्मिक,सांस्कृतिक कारणांसाठी खगोलीय ज्ञानाची गरज वाटू लागली . विशिष्ट खगोलीय घटनांच्या वेळी विशिष्ट सणवार,उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . सणवार,शेतसारा, पिकचक्र यासाठी कालगणनेची  गरज होती रोजचे दिवस-रात्र ,चंद्राच्या कला , सूर्याचे उत्तर-दक्षिणे कडे होणार प्रवास , विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा येणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून माणसाने  दिवस ,महिना ,वर्ष  हि कालमापनाची एकके निर्माण केली . आणि  इथे खगोलशास्त्राचे बाळ अधिक जोमाने रांगू लागले .


No comments:

Post a Comment