May 25, 2017

ध्रुवबाळाची गोष्ट




       एक होता ध्रुव बाळ. सालस ,समजूतदार ,संस्कारी अगदी  गुणी मुलगा! उत्तानपाद  राजाचा मुलगा  म्हणजे हा राजपुत्र.पण सगळंच गोड गोड असेल तर गोष्ट कशी पूर्ण  होणार? ध्रुवाला असते एक सावत्र आई, एकदम दुष्ट  आणि कगाज! त्यात राजाची आवडती राणी. एकदा ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला असतो तेव्हा त्याची सावत्र आई रागाने त्याला खाली खेचते आणि म्हणते "इथे बसायचा तुला अधिकार नाही "..
 बिचारा ध्रुव रडत आपल्या आई कडे जातो .त्याची  निरुपमा रॉय सारखी गरीब आई ..ध्रुवाला म्हणते जा देवाकडून तुझ्यासाठी स्थान माग. ध्रुव मनाशी निश्चय करतो  की आपण अशी जागा मिळवायची की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही.
ध्रुव दाट जंगलात जातो .थंडी ऊन वारा पाऊस कसली पर्वा न करता कठोर तपश्चर्या करतो. शेवटी विष्णू प्रसन्न होतात आणि ध्रुवाला प्रलयात सुद्धा हलणार नाही असं "अढळ" स्थान देतात .असा हा ध्रुव बाळ उत्तर दिशेला आज हि त्या स्थानावर बसला  आहे . सूर्यचंद्र ,ग्रह,तारे  उगवतात मावळात .. धृवाचं स्थान मात्र बदलत नाही

ध्रुवबाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांचीच  लहानपणीची आवडती गोष्ट असायची. आजीने सांगितलेल्या या गोष्टीतून "ध्रुव तारा  नेहमी एकाच जागी दिसतो " हे खगोलीय सत्य लहानपणापासून आपल्या मनात पक्के व्हायचं

समजा आपण  रात्रभर आकाशाचं निरीक्षण केलं तर अस लक्षात येईल कि सगळे तारे पूर्वेला उगवतात  थोड्यावेळाने वर सरकत सरकत नंतर पश्चिमेला मावळात.
एक कॅमेरा स्टँडवर स्थिर ठेऊन थोड्याथोड्यावेळाने   क्लिक केल तर असा फोटो मिळेल यात सगळे तारे उत्तरेला  एका ताऱ्याभोवती फिरल्यासारखे दिसतील तोच हा ध्रुव तारा 


बारकाईनं पाहिलं तर रात्री जर आपण उत्तर दिशेला क्षितिजापासून  साधारण  एक वित अंतरावर आपल्याला  एक अंधुक तारा दिसतो तो म्हणजे हा ध्रुव. बऱ्याचवेळा आपण ध्रुवबाळाच्या पराक्रमाने इतके भारावून गेलो असतो कि ध्रुवतारा हा तेजस्वीच असला पाहिजे असं समजून व्याध किंवा इतर ताऱ्यांना ध्रुवतारा समजतो.(आणि मग त्याच्या उगवण्या मावळण्या सोबत आपली "उत्तरदिशा" पण बदलते !)खरतर ध्रुवतारा हा सामान्य  प्रतीचा तारा आहे .
ध्रुवमत्य तारकासमूहातील अल्फा तारा असणारा  ध्रुव आपल्या पासून ४३४ प्रकाशवर्ष अंतरावर आहे . पृथ्वीवरून दिसणाऱ्या तेजस्वी तार्यांची यादी बनवली तर ध्रुवतार्याचा क्रमांक ४५ वा असेल .
आपल्याला डोळ्यांनी दिसताना ध्रुवतारा एक दिसत असला तरी प्रत्यक्षात तो द्वैती तारा आहे.

ध्रुवतारा 'अढळ' का?
ध्रुवतारा आपल्याला उगवताना,मावळताना न दिसता एकाच जागी स्थिर दिसतो याच कारण म्हणजे तो पृथ्वीच्या  अक्षावर आहे.
समजा आपण आपल्या घरात स्वतःभोवती गोल गोल फिरलो तर सभोवतालच्या वस्तू आपल्याभोवती गोल फिरताना दिसतील . भिंतीवरचा टीव्ही  त्याच्याकडे पाठ झाल्यावर दिसणार नाही .फेरी पूर्ण होऊन तो पुन्हा समोर आला कि दिसायला लागेल . पृथ्वीचं पण अगदी असाच आहे . पृथ्वीच्या परिवलनामुळे बाकीचे तारे आपल्याला उगवताना, मावळताना दिसतात.


पण समजा आपण वर बघत स्वतःभोवती फेरी मारली तर डोक्यावरचा फॅन आपण कितीही गोल गोल फिरलो तरी कायम दिसत राहील. . फॅन आपल्याला कायम का दिसत असेल? कारण तो आपल्या डोक्यावर आहे
ध्रुवतार्याचं पण अगदी असाच आहे तो पृथ्वीच्या 'डोक्यावर ' म्हणजे अक्षावर आहे .त्यामुळे पृथ्वी कितीही फिरली तरी ध्रुवतारा आपल्याला एकाच जागी दिसतो

म्हणजे पृथ्वीच्या अक्षाजवळचा तारा हा "अढळ" वाटतो .  पोलॅरिस हा तारा  पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या अक्षा जवळ आहे .पण पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या अक्षा जवळ  असा एकही तारा नाही .त्यामळे दक्षिण गोलार्धात 'ध्रुव'तारा नाही.
गंमत म्हणजे पोलॅरिस हा अगदी  त्या अक्षावर नाही .त्याच्या पासून थोडासा लांब आहे .त्यामुळे तो पण अक्षबिंदू भोवती फिरत असतो पण ते अंतर फार कमी असल्याने आपल्या समजत नाही

ध्रुवतारा कसा शोधावा ?
ध्रुवतारा आधीच अंधुक त्यात शहरात  प्रकाशाच्या प्रदूषणात बऱ्याचदा  तेजस्वी  तारे दिसणं पण मुश्किल . हे कमी कि काय म्हणून धृवाचं स्थान बऱ्यापैकी क्षितिजाजवळ . यामुळे बऱ्याचदा शहरातून ध्रुवतारा दिसणं  थोडं कठीण होत.अश्यावेळी इतर तारकासमूहांचा उपयोग करून ध्रुवतारा शोधता येतो.
सप्तर्षी  वरून ध्रुवतारा शोधता येतो.सप्तर्षींच्या  क्रतू आणि पुलह या दोन ताऱ्यांना काल्पनिक रेषेने जोडून ती रेषा साधारण ५ पट वाढवली कि ध्रुवतारा सापडेल.  रात्रभर आकाशच निरीक्षण केलं तर  सप्तर्षी  तारकासमूह ध्रुव भोवती प्रदक्षिणा घातल्या सारखा  फिरताना दिसेल . पण प्रत्येकवेळी त्याचे पहिले २ तारे ध्रुवाकडे रोखले असतील.

पण आपल्या कडे साधारण डिसेंबर नंतर सप्तर्षी  संध्याकाळी उगवतात . तो पर्यंत M किंवा W आकाराचा शर्मिष्ठा तारकासमूह आपल्या मदतीला येतो .याच्या दोन त्रिकोणा चे   काल्पनिक कोन दुभाजक जिथे  छेदतात तिथे ध्रुव तारा असतो
शर्मिष्ठा आणि सप्तर्षी एकमेकांच्या  विरुद्ध बाजूला आहेत .त्यामुळे आकाशात दोघांपैकी  एकतरी तारकासमूह असेलच

इतर ग्रहांचे 'ध्रुवतारे'
जस पृथ्वीला पोलॅरिस हा उत्तरी ध्रुव तारा आहे तसा इतर ग्रहानंदेखील त्यांचा ध्रुवतारा असू शकतो .
एखाद्या ग्रहाच्या अक्षाच्या दिशेने जो तारा असेल तो तारा त्या ग्रहाचा 'ध्रुव तारा ' असतो

सूर्यमालेतील पहिला ग्रह म्हणजे बुध. कालेय तारकासमूहातील   Omicron Draconis हा तारा बुधाचा उत्तरी ध्रुव तारा आहे  तर चित्रफलक तारकासमूहातील अल्फा तारा  Alpha Pictoris बुधाचा दक्षिणी ध्रुव तारा आहे.

कालेय तारकासमूहातील 42 Draconis  हा तारा शुक्राचा दक्षिणी ध्रुव तारा आहे(शुक्र उलटा असल्याने ) तर असिदंष्ट तारकासमूहातील Eta Doradus हा उत्तरी ध्रुव तारा आहे .
याच तारकासमूहातील डेल्टा तारा Delta Doradus आपल्या चंद्राचा दक्षिणी ध्रुव तारा आहे.

नौशीर्ष तारकासमूहातील Kappa Velorum  हा तारा मंगळाच्या  दक्षिणी ध्रुव अक्षाजवळ आहे .तर उत्तरी ध्रुव अक्षाजवळ असणारा   HD 201834 हा तारा खूपच अंधुक आहे.मंगळाचा उत्तर ध्रुवीय अक्ष हा हंस तारकासमूहातील  डेनेब आणि वृषपर्वातील अलडेरामिन  या ताऱ्यांच्या मध्यभागी आहे .


कालेय तारकासमूहातील Zeta Draconis  हा तारा गुरूच्या उत्तरी अक्षबिंदू पासून २ डिग्री लांब आहे.तर HD ४०४५५  अंधुक तारा दक्षिणी ध्रुव तारा आहे.

शनीला उत्तरी ध्रुवतारा नाही. अष्टक  तारकासमूहातील  Delta Octantis हा तारा त्याचा  दक्षिणी ध्रुव तारा आहे.

नौशीर्ष तारकासमूहातील Gamma Velorum. तारा  नेपच्युन  चा दक्षिणी ध्रुव तारा आहे तर त्याच्या उत्तरी अक्ष  हंस तारकासमूहातील गॅमा आणि डेल्टा  ताऱ्यांच्या मध्यावर रोखला आहे.

  या ७ ग्रहांचे अक्ष साधारण पणे ३० अंशाच्या आतच कललेले आहेत ,त्यामुळे  त्यांचे उत्तरी ध्रुवतारे आपल्या पोलॅरिस च्या आसपासचेच तारे आहेत .पण युरेनस हा ग्रह  चक्क  आडवा पडलाय  त्याचा अक्ष ९७ अंशातून कललेला आहे .त्यामुळे त्याचे ध्रुव तारे इतरांच्या ध्रुवतार्या पासून फार लांब असतील.
  भुजंगधारी तारकासमूहातील  Eta Ophiuchi  तारा युरेनसचा उत्तरी ध्रुव तारा आहे  तर मृग तारकासमूहातील 15 Orionis हा  दक्षिणी ध्रुव तारा आहे.










May 17, 2017

ये तारा वो तारा हर तारा-१


ताऱ्यांचा 'इतिहास '
रात्रीच्या आकाशात नजर टाकली तर आपल्याला दिसतात ते लुकलुकणारे असंख्य तारे. खरतर खगोलशास्त्राची सुरवातच या ताऱ्यांना पाहून होते असं म्हणावं लागेल .खगोलशास्त्राची आवड असो वा नसो लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहत बालपण न गेलेला माणूस विरळाच ! 


या  "लख लख चंदेरी तेज्याच्या न्याऱ्या दुनियेला " आपले पूर्वज सुद्धा भुलले होते. हे तारे म्हणजे काय असावे? ,ते का लुकलुकतात ? दिवसा ते कुठे जातात ? ते किती लांब असावे ? असे अनेक प्रश्न त्यांना पडत होते आणि त्याचे त्यांनी अनेक तर्क सुद्धा लावले. त्या काळी  माणसाला असं वाटायचं कि पृथ्वी भोवती आकाशाचा एक घुमट आहे आणि तारे त्यात जड्वले आहेत .थोडक्यात सगळे तारे एकाच अंतरावर आहेत.त्यांना नाव देणे, तेजाप्रमाणे त्यांची गट पडणे हाच काय तो अभ्यास .थोडक्यात काय तर त्या काळचे खगोलतज्ज्ञ ताऱ्यांचे बारसे करत बसायचे.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात हिपार्कस यांनी ताऱ्यांची पहिली यादी बनवली .यात पुढे  टॉलेमी ने भर घातली. हा वारसा अरबांनी पुढे अगदी १५ व्या शतका पर्यंत चालविला.पाश्चिमात्य देशांत प्रचलित असणारी बहुतेक नावे अरबांनी दिलेली होती.

पण जसजसा ताऱ्यांचा अभ्यास वाढू लागला तसं तसं प्रत्येक  ताऱ्याचा  नाव देणं आणि सगळी नाव लक्षात ठेवणं भलतंच अवघड होत गेले.१७ व्या शतकात यात पहिली सुधारणा केली योहान बायर यांनी.त्यांच्या पद्धतीनुसार  प्रत्येक ताऱ्याला वेगळं नाव देण्यापेक्षा तो तारा ज्या तारकासमूहात असेल त्याच नाव आणि ग्रीक मुळाक्षरे - α,β,γ, δ वैगरे वापरायची. सगळ्यात तेजस्वी तारा α ,त्याच्या पुढचा β.म्हणजे मित्र हा तारा α-सेंटॉरी  या नावाने ओळखला जाईल.
साध्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या ताऱ्यांसाठी हि पद्धत फार उपयोगी पडली .आता तार्यांची नावे आठवत डोकं खाजवण्या पेक्षा इतर अभ्यास करायला मोकळीक मिळाली .

याच सुमारास दुर्बिणीचा शोध लागला आणि डोळ्यांनी न दिसणारे असंख्य तारे आता माणसाला दिसू लागले .१७ व्या शतकात तारे हे प्रतिसूर्यच आहेत हि कल्पना पुढे आली.  ताऱ्यांची पृथ्वीपासूनची अंतरे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पराशय पद्धतीने तार्यांची अंतरे मोजणं सुरु झालं.
तारे म्हणजे प्रतिसूर्यच आहेत, ही कल्पना मूळ धरू लागली. त्याच बरोबरीने आकाशातील ताऱ्यांचे वितरण व ताऱ्यांची पृथ्वीपासूनची अंतरे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

जशी जशी मानवाची आकलनशक्ती आणि विज्ञानाची प्रगती पुढे गेली तसे तसे तार्यांबद्दल प्राथमिक प्रश्न मागे पडून जरा प्रगल्भ प्रश्न तयार झाले  ताऱ्यांच्या आत कुठले इंधन जळत असेल ?ते संपल्यावर  काय? ताऱ्यांचे जीवनचक्र कसे असेल?  हा अभ्यास सुरु झाला.एकोणिसाव्या शतकात वर्णपटानुसार ताऱ्यांचे वर्गीकरण करण्याचाही प्रयत्न सुरू झाला .तार्यांकडून येणाऱ्या प्रकाशाचे पृथकरण करून तार्यांमधली मूलद्रव्ये ,अंतर्गत भौतिक क्रिया  यांचा अभ्यास करता येऊ लागला
ताऱ्याच्या आत काय घडामोडी घडत असतील  यावर  लक्ष केंद्रित झाले .ताऱ्यांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा अणुकेंद्रीय विक्रियांमुळे उत्पन्न होत असावी,  हि कल्पना मूळ धरू लागली.

विसाव्या शतकात हा अभ्यास जोमाने वाढला . आपले भारतीय शास्त्रज्ञ  मेघनाद साहा यांनी वर्णपटावरून ताऱ्यांचे पृष्ठतापमान व वातावरणीय दाब काढण्याची पद्धत शोधून काढली.१९३१ मध्ये अवकाशातून येणाऱ्या रेडिओ तरंगांचा शोध लागला व रेडिओ दुर्बीण  हे एक नवीनच साधन ताऱ्यांच्या  अभ्यासासाठी मिळालं.

इ. स. १९६० सालानंतर ताऱ्यांकडून येणाऱ्या Infrared, Ultraviolet, X-Ray या प्रकारच्या लहरीचं मापन करून अभ्यास सुरु झाला.नंतरच्या काळात फक्त पृथ्वी वरूनच  नाही तर आपल्या वातावरणाच्या बाहेर असणाऱ्या हबल सारख्या दुर्बिणीतून ताऱ्यांचा अभ्यास केला गेला.तंत्रज्ञानातील प्रगती सोबत हा अभ्यास अधिक जोमाने होतो आहे आणि यातून ताऱ्यांविषयीच्या  आपल्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत आहे

अलीकडच्या काही संशोधनांतून आपल्याला कळतंय कि पृथ्वीवरील जीवसृष्टी हि सुद्धा ताऱ्यांचीच देणगी आहे. जीवनासाठी आवश्यक कार्बन ,नायट्रोजन ,ऑक्सिजन हि मूलद्रव्ये ताऱ्यांच्या धुळीचा स्वरूपात पृथ्वीवर आली आणि इथे जीवनाची बीजे रोवली  गेली थोडक्यात काय तर We are Stardust!!
कदाचित म्हणूनच आपल्याला ताऱ्यांचे आकर्षण आणि त्यांची ओढ असावी का?

May 8, 2017

ओळख तारकासमूहांची-२

आकाशातील ताऱ्यांचा विशिष्ट आकार असलेला समूह म्हणजे तारकासमूह होय Constellātiō(ताऱ्यांचा संच ) या लॅटिन शब्दापासून constellation  हा शब्द बनला आहे.

एका तारकासमूहातील ताऱ्यांचा परस्परांशी काही संबंध असतो का? याचे उत्तर आहे शक्यतो नाही !!
उदाहरणार्थ सप्तर्षी हा आपल्याला सुपरिचित तारकासमूह .याच्या ७ ठळक तारे एकमेकांपासून प्रचंड दूर अंतरावर आहेत.क्रतू हा तारा आपल्यापासून २१०  प्रकाशवर्ष  दूर आहे तर अत्री हा तारा ६३ प्रकाशवर्ष दूर आहे. यातील सगळे तारे  वेगवेगळ्या अंतरावर आहेत आणि त्यामुळे त्यांचाच परस्परांशी काही संबंध नाही .पृथ्वी  पासून त्यांचे अंतर प्रचंड असल्याने आपल्याला ते एका प्रतलात असल्यासारखे वाटतात .

एक कल्पना करूया कि सप्तर्षी तारकासमूहातील एखाद्या ताऱ्याजवळ समजा  वसिष्ठताऱ्याजवळ एखादा ग्रह असेल आणि तिथले रहिवासी  आपल्या भेटीस आले आणि आपण त्यांना विचारलं काय तुम्ही सप्तर्षी तारकासमूहातून आले का ? तर त्यांना काही एक कळणार नाही .कारण वसिष्ठ तारा त्यांचा सूर्य असेल आणि बाकीचे ६ तारे त्यांना वेगळ्याच ठिकाणी दिसतील त्यामुळे सप्तर्षी असा काही तारकासमूह त्यांना माहीतही नसेल .उलट कदाचित आपला सूर्य त्याच्या साठी एखाद्या तारकासमूहासातला तारा असेल  आणि तेच आपल्याला विचारतील  तुम्ही गाढव तारकासमूहातले का हो?

गमतीचा भाग सोडून इतका लक्षात ठेउयात कि  तारकासमूहा चा आकार हा फक्त पृथ्वी वरून तसा दिसतो  प्रत्यक्षात  त्यातील तारे एकमेकांपासून लांब असतात.

तारकासमूहांचा अभ्यास करताना आपल्याला पुढील गोष्टीचा विचार करावा लागतो

१) तारकासमूहाचे स्थान:
आकाशात दोन्ही गोलार्ध मिळून ८८ तारकासमूह  आहेत.याचा अर्थ ते आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही तारकासमूह हे फक्त उत्तर गोलार्धातून दिसतात (उदा -सप्तर्षी,शर्मिष्ठा ) तर काही फक्त विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून दिसतात  (उदा -) .आपण पृथ्वीवर कुठे आहोत त्याप्रमाणे आपल्याला कुठले तारकासमूह दिसतील हे ठरेल.काही तारकासमूह हे आयनिकवृत्तावर आहेत (सिंह,कन्या,मेष )काही तारकासमूह हे खगोलीय विषुववृत्तावर आहेत (मृग,भुजंगधारी)
आकाशात तारकासमूहाचे स्थान हे  विषुवांश आणि क्रांती या दोन निर्देशांकाचा उपयोग करून सांगता येते. उदाहरणार्थ  वृषभ तारकासमूहाचे विषुवांश ४ ता. २० मि. व क्रांती + १९आहे म्हणजे ह्या तारकासमूहातून जाणारे होरावृत्त हे खगोलीय विषुववृत्ताला वसंतसंपाताच्या पूर्वेस ४ तास २० मि. अंतरावर असलेल्या बिंदूमध्ये छेदते तर ह्या तारकासमूहातून जाणारे आडवे वृत्त खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेस १९ आहे.
२)तारकासमूहाचा आकार आणि क्षेत्रफळ :
सगळ्या तारकासमूहांचा आकार एकसारखा नाही.कन्या,वासुकी,सप्तर्षी ,शौरी हे आकाराने मोठेआहेत तर त्रिशंकू,ढाल,दक्षिण त्रिकोण हे आकाराने लहान आहेत,वासुकी(Hydra) हा सगळ्यात मोठा तारकासमूह असून त्याने आकाशाचा १३०२.८४ चौरस अंश इतका भाग व्यापलाय तर ६८.४५ चौरस अंशात असलेले त्रिशंकू(Crux) हे सगळ्यात लहान तारकासमूह आहे . लहान तारकासमूह शोधणे थोडे कठीण  पडते .
तारकासमूह
क्षेत्रफळ(चौरस अंश)
वासुकी (Hydra)
1302.84
कन्या  (Virgo)
1294.43
सप्तर्षी (Ursa Major)
1279.66
तिमिंगल(cetus)
1231.41
शौरी (Hercules)
1225.15
कर्काटक (Circinus)
93.35
शर (Sagitta)
79.98
अश्वमुख (Equuleus)
71.74
त्रिशंकू(Crux)
68.45

३)तारकासमूहांचे काल्पनिक आकार :
तारकासमूहांच्या आकृतीत काहीतरी आकारांची कल्पना केली तर तारकासमूह शोधणे सोप्पे जाते हि आपल्या आदिम पूर्वजांपासूनची युक्ती.आपल्याला पूर्वजांना दिसलेला आकार आज आपल्याला दिसेलच असे नाही.
कारण कदाचित त्यावेळी त्यांना अधिक  तारे दिसत असल्याने आकारांची कल्पना करणे सोपे गेले असेल. सध्या प्रकाशाचे प्रदूषण ,पृथ्वीच्या गती अश्या अनेक कारणामुळे आपल्याला काही तारे दिसणे कठीण असते. उदाहरणार्थ बृहत ऋक्ष या मोठ्या  तारकासमूहात अस्वल दिसण्याइतके तारे आपल्याला दिसत नाही त्यातली पतंगाच्या आकारातील ७ तारे आपण पाहू शकतो  ज्यांना आपण  सप्तर्षी  म्हणून ओळखतो.

सिंह ,वृश्चिक यांसारख्या काही तारकासमूहांचे आकार त्यांच्या नावाप्रमाणे वाटतात.ओरायन मध्ये हरीण आणि वृषभेत बैलाचे दोन शिंग यांची कल्पना करायला थोडा डोक्याला ताण  द्यावा लागतो.परंतु धनु तारकासमूहात "धनुष्य घेऊन बाण रोखलेला अर्धा माणूस अर्धा घोडा" हि कल्पना करणे किंवा कन्या तारकासमूहात एका हातात कणीस एका हातात शेगडी घेतलेली सुंदर स्त्री हि कल्पना करणे हि निव्वळ अशक्य गोष्ट.अश्यावेळी या कल्पना विस्तारात डोकं घालण्यापेक्षा आपल्याला सहज दिसतील असे आकार आपण तयार करू शकतो.

मृग तारकासमूहात एका हातात तलवार दुसऱ्या हातात ढाल घेऊन बसलेला शिकारी बघण्या पेक्षा त्याला डमरू मानणे सोप्पे जाते .धनु तारकासमूहासाठी चहाची किटली बघता येते. शौरी तारकासमूहात हर्क्युलिसचे शरीर बसवणियापेक्षा ते एक मोठे फुलपाखरू आहे असे मानता येऊ शकते.भूतप तारकासमूहासात कोणाला  आईस्क्रीमचा कोन दिसू शकतो तर कोणाला भीमाची गदा. शेवटी ज्याची त्याची कल्पनाशक्ती!

पण हे करत असताना आपल्याला त्याचे नाव बदलून चालणार नाही . बृहत ऋक्ष या तारकासमूहात ग्रीक लोकांना अस्वल दिसले ,इंग्लंड मध्ये याला मोठा चमचा म्हणून ओळखले जाते .भारतीयांना ते ७ पवित्र ऋषी वाटतात तर ग्रामीण भागात याला चोर खटले असं म्हणून त्यात एक खाट,त्याला चोरायला आलेले ३ चोर ,त्याचे रक्षण करणारी म्हातारी अशी गोष्ट जोडली गेली . काहींना त्याच्यातच नांगर वाटला तर काहींना खाटिकाची सूरी. आकाराची  कल्पना काहीही करा पण खगोलीय भाषेत त्याला "Ursa Major" याच नावाने ओळखावा लागेल.

४)तारकासमूहांच्या दंतकथा
५)तारकासमूहांचे कुटुंब  आणि शेजारी
६)तारकासमूहातील तारे
७)तारकासमूहातील अवकाशस्थ पदार्थ
८) तारकासमूहातून होणारे उल्कावर्षाव 



याच्या पुढे एका एका तारकासमूहाची माहिती  घेताना आपण वरील मुद्यांचा विचार करणार आहोत.

May 3, 2017

राशीचक्र

राशीचक्र म्हटलं  कि आपल्याला शरद उपाध्ये आठवतात आणि मग अमक्या राशीचा माणूस रागीट तमका शंकेखोर किंवा रोज पेपर मध्ये येणार राशी भविष्य हे सगळं डोळ्या समोर येत .
खगोलशास्त्रीय दृष्ट्या राशी म्हणजे काय आणि त्याचे काय महत्व होते ते पण पाहणार आहोत.

उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्यांवर माणसाने आकाशातील ताऱ्यांचे काल्पनिक समूह करून त्यांना काही तरी नावे दिली ज्यांना तारकासमूह म्हटले जाते .हळूहळू माणसाच्या हे लक्षात आले  कि या सगळ्या तारकासमूहांमध्ये काही थोडे तारकासमूह आहेत कि त्याच्यातून सूर्य आणि चंद्राचे भ्रमण होते म्हणजे थोडक्यात काही तारकासमूह हे सूर्याच्या भ्रमण मार्गात आहे .

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य आपल्याला अगदी लहानपणापासून  माहित आहे . पण पृथ्वी वरून निरीक्षण करताना आपल्याला असे भासते कि सूर्य पृथ्वीची प्रदक्षिणा करतो आहे .सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे  पृथ्वी भोवती एक मोठे वर्तुळ आपण मानू  शकतो .

सूर्याचा हा भासमान मार्ग म्हणजे आयनिक वृत्त( Ecliptic) होय अर्थातच हे एक काल्पनिक वर्तुळ  आहे.


चंद्र हा सुद्धा सूर्याच्या या मार्ग जवळूनच भ्रमण करतो .इतकेच काय बाकीच्या ग्रहांचे भ्रमण मार्ग सुद्धा आयनिक वृत्त जवळच आहेत . थोडक्यात हि सगळी मंडळी शाळेत जाणाऱ्या गुणी मुलांसारखी आयनिक वृत्तावरून एका रांगेत जातात . ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह या आयनिकवृत्ताच्या पार्श्वभूमीवर  दिसतात .त्यामुळे सूर्य किंवा चंद्र  आणि इतर ग्रह नेहमी या १२ पैकी कुठल्या तरी एका तारकासमूहातच असतात
या १२ तारकासमूहांना राशी असे म्हटले गेले.ह्या राशी म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन हे तारकासमूह.

राशी हि कल्पना भारतीय नाही .अगदी रामायण-महाभारतात सुद्धा राशींचे उल्लेख नाही . इसपु  पाचव्या सहाव्या शतकात भारतीयाना राशी  कल्पनेशी परिचय झाला असावा.राशी हि कल्पना मुळात सुमेरियन किंवा बॅबिलोनियन लोकांनी प्रचारात आणली असावीत.चीनमध्ये उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढा, वानर, कोंबडा, कुत्रा व अस्वल अशी राशींची नावे होती. आज  प्रचलित असणारी  मेषादि नावे हिपार्कस यांच्या काळात (इ. स. पू. सु. १३०) रूढ झाली.हिपार्कस यांना अकराच राशी माहीत होत्या असे दिसते .पुढे वृश्चिकेतील काही भाग वेगळा करून तूळ हि एकमेव निर्जीव चिन्ह असलेली रास  बनविण्यात आली  असावी .


थोडक्यात राशी म्हणजे फार काही वेगळे नसून ८८ पैकी १२ तारकासमूहांना दिलेला दर्जा आहे . जसं मंत्र्यांना  गाडीवर  लाल दिवा लावून मिरवत येत तसं.आकाशात  इतके सगळे तारकासमूह असताना फक्त या १२ तारकासमूहांनाच इतके महत्व का? याचे ऊत्तर म्हणजे या राशींचा उपयोग करून कालगना करता आली .

वेगवेगळे सणवार साजरे करण्यासाठी, पिकचक्रासाठी शेतसारा इत्यादी भरण्या साठी माणसाला महिना ,वर्ष यांच्या सारखी कालपमापनाची एकक आवश्यक होती . सूर्य आणि चंद्र यांच्या राशी भ्रमणावरून कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले . सूर्य चंद्राच्या राशीन मधील प्रवेशावरून काही अंदाज बांधता येऊ लागले. उदाहरणार्थ  आपल्या कडे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला कि पावसाळा सुरु होतो त्याला अनुसरून शेतकरी शेतीची कामे करीत असत.

या १२ राशींनी आयनिकवृत्ताचा सारखा भाग व्यापलेला नाही . उदाहरणार्थ कन्या हे आकाराने मोठे तारकासमूह आहे तर  कर्क हे लहान.त्यामुळे सूर्य हा कर्क तारकासमुहाजवळ थोडा वेळ दिसेल तर कन्या तारकासमुहाजवळ त्याचे भ्रमण दीर्घ काळ चालेल .एका वर्षात सूर्य १२ राशींचे भ्रमण करतो त्यामुळे कालमापन करण्यासाठी आयनिक वृत्ताचे १२ समान भाग करण्यात आले . ३६०➗१२ = ३० म्हणून आयनिक वृत्ताच्या  ३०° च्या  भागाला एक रास मानले गेले (भलेही  प्रत्यक्षात त्या भागात त्या तारकासमूहाचा किती का हिस्सा असेना ) या मुळे सूर्य  एक महिन्यात एका राशीत असतो आणि त्याने १२ राशी ओलांडल्या कि एक वर्ष होते असे कालमापन करणे सोप्पे जाऊ लागले .सूर्य कोणत्या राशीत आहे हे समजले कि आयनिक वृत्तावर तो नेमका कुठे आहे याचा अंदाज  करता येतो . त्यावरून ऋतू , पाऊसपाणी, सणवार इत्यादींचे अंदाज करता  येऊ लागले .

आयनिकवृत्त हे एक वर्तुळ असून राशी म्हणजे ३० चा एक भाग हे आपल्याला समजले .पण आता या राशिचक्राची सुरवात करायची कुठून ? एखाद्या वर्तुळाचे आपल्याला समान १२ भाग करायचे असतील तर वर्तुळावरील एखादा बिंदू आरंभ बिंदू म्हणून घ्यावा लागेल त्याच्या पासून ३०° वर दुसरा बिंदू काढावा लागेल.त्याच्या पासून पुढचा बिंदू ३०° वर असेल.असे १२ भाग आपल्याला काढता येतील .

आयनिकवृत्तावर वसंतसंपातबिंदू हा आरंभ बिंदू मानला गेला . ज्या काळात राशी संकल्पना पुढे येत होती त्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिली शतकात वसंतसंपात बिंदूच्या पार्श्वभूमीवर मेष तारकासमूह होते . त्यामुळे मेष हि पाहिलं  रास ठरली . वसंतसंपात बिंदू पासून पुढचे ३०° इतकी तिची व्याप्ती (प्रत्यक्षात मेष तारकासमूह त्याच्या आधीच संपते )त्याच्या पुढचे ३०° म्हणजे वृषभ रास आणि याप्रमाणे पुढे राशीचक्र तयार होत.
 पृथ्वीच्या परांचांगती मुळे वसंतसंपात बिंदू दरवर्षी ५० कोनीय सेकंदाने मागे जातो.सध्या तो  मिन राशीमध्ये आहे सायन राशी आणि निरयन राशी या वादाचे कारण हेच आहे .या वादात न पडता आकाशनिरीक्षणासाठी आपल्याला निरयन राशी उपयुक्त आहे.

सूर्य चंद्राच्या राशिप्रवेशावरून आपल्याला कोणते तारकासमूह दिसतील याचा अंदाज  बांधता येतो.
उदाहरणार्थ सूर्य १४ एप्रिलला मेषराशी मध्ये प्रवेश करतो त्. १४ एप्रिल नंतर मेष रास सकाळी सूर्य सोबत उगवेल आणि संध्याकाळी सूर्यासोबत मावळेल.यामुळे जर मेष रास बघायची असेल तर ती १४ एप्रिलच्या आधीच पाहावी लागेल . परंतु मेष रास मावळात असताना पूर्वेला कन्या उगवत असेल  आणि ती रात्र भर आकाशात दिसेल. त्यामुळे कन्या रास बघायचा सर्वतोत्तम कालावधी हा एप्रिलच्या मध्यानंतर असेल. पौर्णिमेला चंद्र ज्या राशीत असेल ती रास चंद्र प्रकाशामुळे दिसणार नाही .
तुम्हाला ग्रह शोधायचे असतील तर आकाशात इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज नाही .ग्रह हे नेहमी कुठल्यातरी राशीतच सापडतील . उदाहरणार्थ गुरु हा कधी सप्तर्षीत किंवा मंगळ कधी  नरतुरंग तारकासमूहात दिसणार नाही. त्यामुळे राशी हि संकल्पना समजली तर आकाशनिरीक्षण करणे सोप्पे जाते .

पुढच्यावेळी जेव्हा राशी हा शब्द तुमच्या नजरे समोर येईल तेव्हा भविष्य ,स्वभाव,प्रीती-षडाष्टक असलं काही न आठवता विशाल आयनिक वृत्ताचे १२ भाग आणि त्याच्या पार्श्वभूमीवरचे १२ तारकासमूह तुम्हाला आठवावेत हीच सदिच्छा !!!!!